मुंबई :
लिव्ह इन रिलेशनशीपला न्यायालयाने मान्यता दिल्याने आपल्याकडे तरुण-तरुणींचा लिव्ह इन रिलेशनशीपकडे कल वाढत आहे. साकीनाका येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या प्रियकर व प्रेयसीमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात व मानेवर वार करून तिची हत्या केली.
चांदिवलीतील संघर्षनगर येथील साईबाबा मंदिराजवळ मनिषा जाधव (29) ही तरुणी आपला प्रियकर राजू निळे (४२) याच्यासोबत तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. राजू हा टीव्ही मॅकेनिक असून मनिषा ही घरकाम करायची. मात्र काही दिवसांपासून दोघे एकमेकांवर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातच राजू आपल्या पहिल्या पत्नीला भेटण्यासाठी गेल्याने या दोघांमधील वाद विकोपाला गेला. यातून गुरूवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात राजूने मनिषावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिच्या डोक्यावर व मानेवर त्याने वार केले. या घटनेची माहिती साकीनाका पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मनिषाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी राजू निळेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली.