Voice of Eastern

मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) १७ व १८ डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ग्रामीण भागामधील वीज पुरवठा, इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या वेळेत परीक्षा देणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा सहा महिने थांबावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पेट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेत सवलत देण्याची मागणी विद्यार्थी संघटनेकडून होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नसताना त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शाळा तसेच महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू ठेवण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यातच मुंबई विद्यापीठाकडून १७ व १८ डिसेंबरला पेट परीक्षा जाहीर केली आहे. मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा १७ डिसेंबर तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा १८ डिसेंबरला होणार आहेत. मुंबई विद्यापीठातून पीएच.डी करण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो. त्यामुळे पेट परीक्षेसाठी राज्यासह देशातून ४,४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये २,६५४ मुली तर १,८४५ मुलांचे अर्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही पेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पेट परीक्षेसाठी विद्यापीठाकडून दोन तासांचा अवधी दिला आहे. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीज, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट यासारख्या समस्यांमुळे महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग किंवा परीक्षा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पेट परीक्षेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. वीज, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट यासारख्या समस्येमुळे विद्यार्थ्याला परीक्षा देणे शक्य न झाल्यास त्याला पुन्हा पेट परीक्षा देण्यासाठी सहा महिने थांबावे लागणा आहे. त्याचा परिणाम त्यांच्या संशोधनावर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता विद्यापीठाने कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान कोणतेही दोन तास विद्यार्थ्यांना त्यांच्या उपलब्ध नेटवर्कच्या सोयीनुसार परीक्षा देता यावी, अशा प्रकारचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात व डॉ. धनराज कोहचाडे यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना केली आहे.

पेट परीक्षेसाठी झालेली नोंदणी
मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या पेट परीक्षेसाठी ४,४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये २,६५४ मुली तर १,८४५ मुलांचे अर्ज आहेत. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक १,९२१ अर्ज प्राप्त झाले असून मानव्यविद्याशाखेसाठी १,१३२, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७४५ आणि आंतरविद्याशाखेसाठी ७०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ४६९ अर्ज आले असून, त्यापाठोपाठ इंग्रजीसाठी २२५ अर्ज आले आहेत.

Related posts

सावधान : क्रिकेट खेळताना ३० ते ४० तरुणांचा मैदानावरच मृत्यू

Voice of Eastern

शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कुटर सरकार – महेश तपासे

ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट : पंकज सावंतचे विकेट्सचे पंचक

Leave a Comment