मुंबई
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींना ठोस पर्याय द्यावा, अशी मागणी करत पीओपीच्या गणेशमूर्तींवर सरसकट बंदी घालण्यास सोमवारी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि मूर्तिकार संघटना यांनी विरोध दर्शविला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त, महापौर किशोरी पेडणेकर आणि सर्वपक्षीय गटनेते यांनी पीओपीला पर्याय देण्याबाबत केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
१२ मे २०२० रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेली मूर्ती विसर्जन नियमावलीच्या अंमलबजावणीसंदर्भात मुंबई महापालिकेने सोमवारी दुपारी २ वाजता महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, गणेशमूर्तिकार, संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत महापौर किशोरी पेडणेकर, समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच ’निरी’चे अधिकारी, गणेश मूर्तिकार संघटनेचे मूर्तिकार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
पीओपीला पर्याय मिळत नाही तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती बनविणे, त्यांची विक्री करणे यावर सरसकट बंदी घालण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी मुर्तीकार संघटनेने केली. मातीच्या मूर्तींसाठी मोठी जागा आणि बरीच माती लागते. या मूर्ती सुकवण्यासाठी बराच वेळ लागतो. गणेशोत्सवावर मूर्तिकार, सजावटकार, मूर्ती विक्रत्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे पीओपी मूर्तींवर बंदी लादू नये, अशी भूमिका मूर्तिकार संघटनेने मांडली. त्याचप्रमाणे पीओपी गणेशमूर्तीला योग्य पर्याय दिल्याशिवाय बंदी घालणे उचित ठरणार नाही, असे मत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनी मांडले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपी गणेशमूर्तीला योग्य पर्याय देण्यात यावा, हा पर्याय देताना सर्वांच्या उपजीविकेचा सकारात्मक विचार करावा, त्यासाठी पालिका विधी विभागाचा कायदेशीर सल्ला घेण्यात यावा, अशी भूमिका महापौर किशोरी पेडणेकर व सर्वपक्षीय गटनेते यांनी व्यक्त केली. नीरी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांची पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये महत्वाची भूमिका असल्याचे मत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मांडले.