मुंबई :
मध्य रेल्वेवर १९ फेब्रुवारीपासून लोकलच्या ३६ नव्या फेऱ्या तर वातानुकुलीत लोकलच्या फेऱ्या १० वरून ४४ पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
ठाणे ते दिवादरम्यान टाकलेली ५ वी आणि ६ वी लाईन सुरू करण्याच्या अनुषंगाने १९ फेब्रुवारीपासून उपनगरीय सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकानुसार ३६ अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मेन लाईनवरील एकूण सेवांची संख्या ८५८ वरून ८९४ पर्यंत वाढणार आहे, तर उपनगरीय सेवांची संख्या १७७४ वरून १८१० पर्यंत वाढणार आहे. मेन लाईनवर वातानुकुलीत उपनगरीय सेवांची संख्या १० वरून ४४ पर्यंत वाढणार आहे. ४४ वातानुकुलीत सेवांपैकी २५ वातानुकुलीत सेवा जलद मार्गावर चालवण्यात येणार असून, त्यात २४ जलद आणि एक अर्ध जलद फेरी असणार आहे.
५ व्या आणि ६ वा मार्ग सुरू झाल्यामुळे काही अर्ध-जलद सेवा जलद किंवा धीम्या सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जलद मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ होणार असून, जलद लोकल फेऱ्या २५७ वरून २७० पर्यंत वाढणार म्हणजे 13 आणखी जलद फेऱ्या वाढणार आहेत. तर धीम्या मार्गावरील सेवांची संख्या ६०१ वरून ६२४ पर्यंत वाढणार आहे. म्हणजे २३ धीम्या मार्गावरील सेवा वाढणार आहेत.
मेन लाईन मार्गासाठी नवीन उपनगरीय वेळापत्रक १८ फेब्रुवारीपासून http://www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्यासाठी AboutUs/Division/Mumbai/Operating/Timetable या लिंकचाही वापर करू शकता.