मुंबई :
राज्यासह मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी मृत्यूमध्ये घट होण्याचे प्रमाण अल्प होते. मात्र रविवारी मुंबईमध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तब्बल दीड वर्षानंतर मुंबईमध्ये कोरोनाने एकाचाही बळी घेतला नाही. २६ मार्च २०२० रोजी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. पालिकेने विविध उपाययोजना करत आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तिसऱ्या लाटेची भीती असताना रविवारी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही बाब मुंबईकरांसाठी समाधानकारक आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाने १६ हजार १८० रुग्णांचा बळी घेतला आहे. तसेच मुंबईत रविवारी ३६७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ५० हजार ८०८ नोंदविण्यात आलेली आहे. तसेच, पालिका रुग्णालयात उपचार घेणारे ६१८ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण ७ लाख २७ हजार ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, सरकारी, पालिकेच्या विविध रुग्णालयात कोरोनाबाधित ५ हजार ३० रुग्ण हे अद्यापही उपचार घेत आहेत.
आज मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २८ हजार ६९७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत मुंबईत एकूण १ कोटी ९ लाख ५७ हजार ३९२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर ९७% एवढा आहे. तर मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दर १ हजार २१४ दिवस एवढा आहे. तसेच, १० ते १६ ऑक्टोबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०६% एवढा आहे.