मुंबई :
अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना कायम करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे यासह विविध मागण्यांसाठी ४५ दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या वैद्यकीय शिक्षकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी शंख, घंटानाद व थाळ्या वाजवून परिसर दणाणून सोडला. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास १४ मार्चपासून रुग्णसेवा बंद करण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला.
अस्थायी डॉक्टरांच्या सेवा नियमित करणे, ७ व्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने भत्ते मिळणे, कंत्राटी डॉक्टरसेवा बंद करणे या मागण्यांसाठी राज्यातील डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे एमबीबीएसला प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्गही अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला बाहेरून प्राध्यापक बोलवावे लागले. शासनाच्या दुर्लक्षामुळे आम्हाला हे नाईलाजास्तव करावे लागत असून, विद्यार्थी व रुग्णांचे होणार्या नुकसानीचा आम्हाला प्रचंड त्रास होत असल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष डॉ. उदय मोहिते व सचिव डॉ. समीर गोलावार यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य झाल्यास आंदोलनामुळे विद्यार्थी, रुग्णालयाचे होणारे नुकसान भरून काढण्याचे आश्वासनही शिक्षकांकडून देण्यात येत आहे. मात्र तरीही सरकारकडून डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टरांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोमवारी घंटानाद करण्यात आल्याची माहिती डॉ मुकुंद कुलकर्णी, डॉ लीना धांडे, डॉ. दिनेश धोडी, डॉ. अमित लोमटे, डॉ. औदुंबर मस्के यांनी दिली.
दरम्यान लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास १४ मार्चपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा बंद करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे मागण्या तातडीने मान्य केल्यास राज्यातील रुग्णसेवा खंडित होण्यापासून रोखणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे मत संघटनेच्या केंद्रीय शाखेने व्यक्त केले आहे.