मुंबई :
कांजूरमार्ग येथील नियोजित कारशेडसाठी जागेवर असलेल्या गवताला सोमवारी सायंकाळी ४ वाजता अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. कारशेडच्या जागेवर आग लागल्याने ही आग लागली की लावण्यात आली, याची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या आगीतून राजकीय धूर बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईतील मेट्रो रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या उभ्या करण्यासाठी कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. या जागेवर सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मेट्रो कारशेडच्या जागेतील गवताला अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दल, पालिका वार्ड कर्मचारी आणि स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, वॉटर टँकरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे कळते.
मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या गाड्या उभ्या करण्यासाठी मागील सरकारने आरे कॉलनीत कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार असल्याने शिवसेनेने त्याला विरोध केला. विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर शिवसेनेने भाजपचा निर्णय बदलत कांजूरमार्ग येथील भूखंडाला मेट्रो कारशेडसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याने सध्या कारशेडची उभारणी रखडली आहे.