मुंबई
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गांतील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा येत्या २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षांकरिता राज्यभरातील साडेनऊ लाखांहून अधिक परीक्षार्थी प्रविष्ट झाले असून राज्यभरात एक हजाराहून अधिक परीक्षा केंद्रे राज्य शासनाने जाहीर केली आहेत.
‘गट क’ साठी २५ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील सकाळच्या सत्रासाठी परीक्षार्थींनी सकाळी ८.३० वाजता, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी दुपारी १.३० वाजता आपल्या नियोजित परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे बंधनकारक आहे.
तर ‘गट ड’साठी २६ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा दुपारी १२ ते २ या वेळेत घेतली जाईल. यासाठी परीक्षार्थींनी सकाळी १०.३० वाजता नियोजित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र अर्ज केलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घ्यावे, तसेच हे प्रवेशपत्र ई-मेल व एसएमएसद्वारेही परीक्षार्थींना पाठविण्यात येणार आहे.
हे पण वाचा- परीक्षार्थींना राजेश टोपे यांचे आवाहन…
परीक्षा केंद्रावर चोख व्यवस्था
परीक्षा केंद्रांवर कोणतीही अडचण परीक्षार्थींना येऊ नये, सुरळीतपणे परीक्षा पार पडाव्यात यासाठी परीक्षा सत्रासाठी एक केंद्र समन्वयक, परीक्षा केंद्र असलेल्या शाळा/महाविद्यालयाने नियुक्त केलेले केंद्र अधिक्षक, उपअधिक्षक, निरीक्षक, अतिरिक्त परीक्षा निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय करोना प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून अंतर नियमनाचे भान राखत दोन परीक्षार्थींमधे पुरेसे अंतर राखले जाईल अशी आटोपशीर आसनव्यवस्था आणि निर्जंतुकीकरण व शरीर तापमानतपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एसएमएस, ई-मेलकडे लक्ष द्या
२५ आणि २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतरही विभागांच्या परीक्षा असल्याने काही जिल्ह्यांत ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलण्यात येऊ शकतो.अर्थात अशा केंद्रांवरील परीक्षार्थींना आधीच एसएमएस, ई-मेलद्वारे त्याविषयी सूचित केले जाईल. यासाठी परीक्षार्थींनी त्यांना येणारे लघुसंदेश व ई-मेल यांकडे लक्ष द्यावे आणि आपले परीक्षा केंद्र कोणते आहे ते जाणून घ्यावे. परीक्षार्थींनी सर्व सूचना नीट वाचून त्या पद्धतीने आपली उत्तरपत्रिका पूर्ण करायची असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. अधिक माहितीसाठी परीक्षार्थींनी www.arogyabharati2021.in आणि www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर भेट देऊन माहिती घ्यावी.