गिरगाव :
दरवर्षी हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडवा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात शोभा यात्रा काढल्या जातात. दरवर्षी आपल्या भव्य दिव्य शोभायात्रेसाठी गिरगाव येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान ओळखलं जातं. गेले २ वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर अनेक बंधनं आली. मात्र यंदाच्या गिरगावातील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने पाडवा साजरा होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे, मात्र यंदाचे हे स्वरूप थोडेसे बदलले असणार आहे. तर या वर्षीच्या गुढी पाडव्यामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्ष ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगावातील पारंपरिक ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ अर्थात ‘गिरगांवचा पाडवा’ गेली दोन दशके आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. यावर्षीचा गिरगावचा पाडवा हा बंदिस्त सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार आहे. २ वर्षाच्या कोरोनाच्या कठीण काळातून बाहेर पडून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले होते. आतापर्यंत तयारीला जोरदार सुरुवात करण्यात आली होती. पण प्रशासनाने ८ एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू केले आहे. या काळात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्याबद्दल प्रशासनाकडून कोणतंच ठोस उत्तर आतापर्यंत आलेलं नाही.
यात्रेत सहभागी अबालवृद्धांचा व गिरगावचा पाडवा बघायला येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होऊ नये यासाठी गिरगांवचा पाडवा वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४४, शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्याच्या शुभदिनी सालाबादप्रमाणे फडके श्री गणेश मंदिर येथे सकाळी श्रीगणेशाचं दर्शन घेऊन आरती करून, गुढी पूजन करून यावर्षी हिंदू नववर्षाचं स्वागत बंदिस्त सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम करून करण्याचे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ने योजले आहे.