मुंबई :
गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी मुंबईत शोभायात्रेसह सांस्कृतिक कार्यक्रमातून गुढी पाडव्याची शोभा वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा मुंबईमध्ये कानात भीकबाळी, कपाळावर चंद्रकोर आणि डोक्यावर फेटा अशा पारंपरिक वेशातील तरुणाई अशा उत्साहात मुंबईतील सर्वात मोठी गिरगावमधील शोभायात्रा निघणार नसली तरी मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे या शोभायात्रांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गिरगावमध्ये स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काढण्यात येणारी शोभायात्रा ही मुंबईकरांचे आकर्षण असते. या शोभायात्रेला मोठ्या प्रमाणात मुंबईकर गर्दी करतात. पण यावर्षी शोभायात्रेऐवजी फक्त सांस्कृतिक कार्यक्रम करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. फडके मंदिरात सकाळी श्रीगणेशाची आरती करून त्यानंतर गुढी पूजन करून बंदिस्त सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे शोभायात्रा काढण्यात येत नसली तरी यंदा शिवसेना प्रभाग क्रमांक १२ तर्फे सकाळी ८ गिरगाव चर्च ते चिराबाजार शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात जगदंब ढोल पथक, १५० बाईकस्वार महिला आणि १६ चित्ररथ असणार आहेत.
दादरमध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आम्ही दादरकर अंतर्गत वेध फाउंडेशनने भव्य गुढी पाडव्याच्या शोभायात्रेचे आयोजन केले आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत ही शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा दादर रेल्वे स्थानकाजवळील सुविधा फॅशन दुकान येथून सकाळी ७ वाजता सुरू होईल. रानडे रोड येथे फुलानी सजलेल्या देखावा रथामध्ये गुढी उभारून या शोभायात्रेचा प्रारंभ होईल. भवानी शंकर मार्ग, गोखले मार्ग असा शोभायात्रेचा मार्ग असणार आहे. यात्रेच्या सुरवातीच्या आणि समाप्तीच्या स्थळी संस्कार भारतीच्या भव्य रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत. मराठी संस्कृती जपणारा पारंपारिक वेष परिधान केलेल्या मुलामुलींच्या ढोलताशा पथकासोबत बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या गजरात ही यात्रा पुढे जाईल. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच मावळे हे या शोभायात्रेची मुख्य आकर्षण असणार आहेत, अशी माहिती वेध फाउंडेशनचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांनी दिली.
शिवडीमध्ये रस्ते रांगोळ्यांनी सुशोभित केले जाणार आहेत. पारंपारिक ढोल ताशां सार्वजनिक मंडळे, पारंपारिक वेशात तरुण तरुणी आणि महिला या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशातील दुचाकीस्वार महिलांचे पथक आणि तेवढ्याच युवकांचे युवाशक्ती पथक यात्रेचे नेतृत्व करत करणार आहेत. शिवडी नाका येथे सकाळी १० वाजता भव्य गुढी उभारून तिचे पूजन करून उत्सवाची सुरुवात होईल. झेंडा पथक व लेझीम पथक यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल, अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष ब्रह्मदेव आतकरी यांनी दिली. त्याचप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा समिती खार यांच्यातर्फे खारमध्ये सकाळी ८ वाजता निर्मल नगर येथील श्री राम मंदिर येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. श्री राम मंदिर निर्मल नगर, निर्मल नगर म्युनिसिपल शाळा, तीन बंगला, खार रेल्वे स्टेशन, साई बाबा रोड, पाईप लाईन रोड, तीन बंगला, निर्मल नगरयात्रेचा मार्ग असणार आहे. खार पूर्व परिसरात ५० मोठ्या गुढ्या उभारण्याचा मानस असून, शोभा यात्रेदरम्यान खार पूर्व विभाग रांगोळीमय करण्यात येणार आहे.