मुंबई :
प्रवाहापेक्षा वेगळं देण्याचा प्रयत्न करणार्या ‘गुल्हर’मध्ये प्रेक्षकांना खर्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे. मोशन पोस्टरपासून चर्चेत राहणार्या गुल्हरचं नवं पोस्टर व ६ मे २०२२ ही प्रदर्शनाची तारीख गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आली. ‘गुल्हर’मध्ये रवी काळे आणि भार्गवी चिरमुले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
वेगळे प्रयोग करण्याचे संकेत दिलेल्या ‘गुल्हर’मध्ये रवी काळे आणि भार्गवी चिरमुले ही जोडी नव्या पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. रवी आणि भार्गवी यांनी या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केलं आहे. रवी यांनी चित्रपटात गिरीजू ही व्यक्तिरेखा तर भार्गवीने राधाची भूमिका साकारली आहे. धनगर समाजातील कुटुंबावर आधारलेलं कथानक ‘गुल्हर’मध्ये आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही बर्याचदा नाविन्यपूर्ण भूमिकेत झळकलेले रवी यात अतिशय सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत आहेत.
नुकत्याच रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही सुखी वाटणार्या कटुंबाचं चित्र पहायला मिळतं. चित्रपटाची कथा ११ वर्षाच्या मुलाभोवती गुंफली आहे. यात विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले, सुरेश विश्वकर्मा, शिवानी बावकर, रुक्मिणी सुतार, कपिल कदम, गणेश कोकाटे, पुष्पा चौधरी, मंजिरी यशवंत, अनुप शिंदे, शिवाजी भिंताडे, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, देवेंद्र वायाळ, सचिन माळवदे आणि गणेश शितोळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे समजले जाणारे पुरस्कारांवर नाव कोरणारा ‘गुल्हर’ ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.