मुंबई :
हाफकिन जीव–औषध निर्माण महामंडळाने जीवरक्षक उत्पादनाच्या निर्यातीद्वारे देशाला १३७ कोटी रूपयाचे परकीय चलन मिळवून दिल्याबद्दल राज्य शासनाने ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट निर्यातदार’ पुरस्कार देऊन हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला गौरवण्यात आले.
उदयोग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते २४ मार्च २०२२ रोजी ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट निर्यातदार’ पुरस्काराचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून हाफकिन महामंडळाला गौरविण्यात आले. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्यावतीने व्यवस्थापकीय संचालिका डॉ. माधवी खोडे चवरे, महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार, जनसंपर्क अधिकारी अमित डोंगरे, हाफकिन असोसिएशनचे अध्यक्ष बबन ढेकणे, हाफकिन मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे सरचिटणीस दिपक पेडणेकर आणि नितीन भवर यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.
‘मानव सेवेत समर्पित’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्यरत असलेले हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ हे विविध जीवरक्षक औषधाचे उत्पादन करून माफक दरात शासनाला पुरवठा करणारा राज्य शासनाचा एकमेव उपक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे चागली उत्पादन प्रणाली मानाकन असलेल्या जगातील सहा कंपन्यांपैकी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ ही एकमेव भारतातील सार्वजनिक उपक्रम असलेली कंपनी आहे. हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची मौखिक पोलिओ लस ही अशिया, अफ्रिका आणि लॅटीन अमेरिका खंडातील देशांमध्ये युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून निर्यात होत आहेत. भारतातील पोलिओचे निर्मूलन करण्यामध्ये हाफकिन महामंडळाने मोलाचे योगदान दिले आहे.