मुंबई :
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीची यादी ४ एप्रिलला दुपारी ४ नंतर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. तसेच पालकांना एसएमएसही पाठवण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून घोषीत करण्यात आले होते. मात्र पालकांना एसएमएस न आल्याने त्यांनी संकेतस्थळाकडे आपला मोर्चा वळवला, परंतु संकेतस्थळही बंद दाखवण्यात येत असल्याने पालकांचा हिरमोड होत होता. संचालनालयाकडून ना एसएमएस येत होता, ना संकेतस्थळावर यादी पाहता येत होती. त्यामुळे राज्यातील पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणारी आरटीई ऑनलाईन अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. ही प्रक्रिया १० मार्चला संपली, त्यावेळी ९ हजार ८८ शाळांतील १ लाख २ हजार २२ जागांसाठी राज्यभरातून २ लाख ८५ हजार ३२२ इतके अर्ज आले. त्यानंतर आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत ३० मार्चला पुणे येथे काढण्यात आली. मात्र यावेळी कोणत्या विद्यार्थ्यांना शाळेची सोडत लागली आहे तर कोण प्रतीक्षा यादीत आहे, याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले. सोडत व प्रतीक्षा यादी ४ एप्रिलला दुपारी ४ वाजल्यानंतर जाहीर करण्यात येईल, तसेच जे विद्यार्थी सोडतीमध्ये विजेते ठरले आहेत, त्यांना एसएमएस पाठवण्यात येईल, असेही संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे दुपारी ४ नंतर प्रत्येक पालक एसएमएसची वाट पाहू लागला. मात्र एसएमएस येत नसल्याने अखेर पालकांनी आपली मोर्चा संकेतस्थळाकडे वळवला. मात्र संकेतस्थळावरही ‘साईट अंडर मेंटेनन्स’ असा मेसेज दाखवण्यात येत होता. त्यामुळे पालक वारंवार संकेतस्थळाला भेट देत होते. मात्र त्यांचा हिरमोड होत होता. पालकांना ना एसएमएस आला ना त्यांना संकेतस्थळावर यादी पाहता येत आहे. त्यामुळे पालकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते, तर काही पालकांनी संकेतस्थळ बंद असल्याबद्दल संताप व्यक्त केला.
आरटीई प्रवेशाचे संकेतस्थळ बंद असण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या अधिकार्यांकडे चौकशी केली असता त्यांनी माहिती अपलोड होण्याचे काम सुरू असल्याने संकेतस्थळ बंद ठेवले आहे. संकेतस्थळ कधी सुरू होईल, हे नेमके सांगता येणार नाही. परंतु रात्री उशीरापर्यंत संकेतस्थळ नक्की सुरू होईल, अशी माहिती दिली.