Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

३१व्या राष्ट्रीय किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाला दुहेरी मुकुट

banner

उत्तराखंड :

हरियाणाने उत्तराखंड येथे झालेल्या ‘३१व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. उत्तराखंडातील नानकपुरी-सुद्रापूर येथे झालेल्या किशोर गटाच्या अंतिम सामन्यात हरियाणाने राजस्थानचा ७१-३९ असा धुव्वा उडवला, तर किशोरी गटाच्या सामन्यात हरियाणाने तामिळनाडूला २९-२५ असे चकवीत विजेतेपदाचा दुहेरी धमाका केला.

अंतिम सामन्यात हरियाणाने आक्रमक सुरुवात करीत भराभर गुण घेण्याचा सपाटा लावला. लागोपाठ दोन लोण देत मध्यांतरालाच राजस्थानवर ३०-१९ अशी अभेद्य आघाडी घेतली. उत्तरार्धात अधिक जोशपूर्ण खेळ करीत आणखी तीन लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. हरियाणाने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धाच्या खेळात २ असे ४ बोनस गुण देखील मिळविले. या धडाकेबाज खेळामुळेच हरियाणाने अंतिम सामन्यात ३२ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवीत राष्ट्रीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. पूर्ण डावात राजस्थानने ९ बोनस गुण मिळविले.  राजस्थान संघाला एकाही लोणची परतफेड करता आली नाही. यामुळेच राजस्थानला मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला.

हरियाणाच्या मुलींचा संघ कप उंचवताना

किशोरी गटात चुरशीने खेळलेल्या अंतिम सामन्यात हरियाणाने तामिळनाडूला २९-२५ असे चकवीत विजेतेपद मिळविले. या विजयाने हरियाणाने स्पर्धेत डबल धमाका साजरा केला. सुरुवात आक्रमक करीत हरियाणाने तामिळनाडूवर पहिला लोण दिला. मध्यांताराला १६-०९ अशी आश्वासक आघाडी घेतली. उत्तरार्धाच्या खेळात मात्र तामिळनाडूने आपल्या आक्रमणाची धार वाढवीत हरियाणावर लोण देत त्याची परतफेड केली. पण हरियाणाने मध्यांतराला घेतलेली आघाडी त्यांच्या कामी आली. त्यामुळे हे विजेतेपद हरियाणाला आपल्या नावे करता आले. स्पर्धेवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावट असताना देखील हरियाणाने या स्पर्धेवर आपली छाप पाडली.

त्यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने उत्तराखंडला ५८-२१असे, तर राजस्थानने छत्तीसगडला ४३-३९ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. किशोरी गटात उपांत्य सामन्यात हरियाणाने उत्तर प्रदेशाला २९-२३ असे, तर तामिळनाडूने दिल्लीला ३१-२९ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.

Related posts

शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार

इनडोअर क्रिकेट विश्वचषक : भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय

४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धेत उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, सांगली बाद फेरीत

Leave a Comment