मुंबई :
सांताक्रुज येथील कालिना विद्यापीठात बॉम्बस्फोट होणार असल्याचा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. बीकेसी पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केल्यावर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेतल्यावर पत्नीसोबत झालेल्या भांडणातून त्याने बॉम्बच्या अफवेचा कॉल केल्याचे उघडकीस आले.
सांताक्रुज येथील कलिना विद्यापीठात बॉम्बस्फोट होणार असल्याचा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला होता. या माहितीनंतर बीकेसी पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. संपूर्ण विद्यापीठ परिसराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कुठेही काहीच आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. बॉम्बस्फोट होणार असल्याचा तो कॉल बोगस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच पोलिसांनी वाकोला येथून सूरज जाधव याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्यानेच बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केल्याचे उघडकीस आले. विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकाने हटकल्याने तसेच पत्नीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याने बॉम्बच्या अफवेचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सुरज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वाकोला आणि खेरवाडी पोलिसांत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. कॉल केल्यानंतर त्याने फोन बंद ठेवला होता. काही वेळानंतर त्याने मोबाईल सुरु केला. जवळपास पाऊणतास त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.