मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा २४ ऑक्टोबरला पार पडणार आहे. राज्यभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडेल. चार लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी या दोन स्वतंत्र सत्रांमध्ये परीक्षेस सामोरे जातील. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण पालन करून ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षार्थींनीही नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन या परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ने केले आहे.
कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची ही भरती परीक्षा राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेद्वारे गट क संवर्गातील शस्त्रक्रिया गृह साहाय्यक, कनिष्ठ/वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक, दंत आरोग्यक, दूरध्वनीचालक, लघुटंकलेखक, वाहनचालक इत्यादी, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेद्वारे अभिलेखापाल, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन आदी पदांसाठी भरती होणार आहे.
असे आहे परीक्षेचे स्वरूप
- प्रत्येकी दोन गुणांचे एकूण १०० प्रश्न, म्हणजे एकूण २०० गुणांची परीक्षा राहील.
- ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे, त्या पदांसाठी मराठी भाषाविषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न हे इंग्रजीमधून असतील.
- ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे, त्या पदांसाठी मराठी भाषाविषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न हे इंग्रजीमधून असतील
- लिपिकवर्गीय पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरील एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुणांची परीक्षा राहील.
- तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरील एकूण ६० प्रश्न, तर तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असतील.
- वाहनचालक पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरील एकूण ६० प्रश्न व पदासंदर्भातील विषयावर ४० प्रश्न असतील.
- परीक्षेचा कालावधी दोन तास असेल.
परीक्षेला जाताना काय काळजी घ्याल
परीक्षार्थींनी संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे आणि त्याची प्रत सोबत ठेवावी. परीक्षार्थींनी प्रवेशपत्रावर आपले छायाचित्र चिकटवून घ्यावे आणि परीक्षा केंद्रावर येताना त्यांनी आपले छायाचित्र असलेले पॅन कार्ड, आधारकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, मतदार ओळखपत्र, छायाचित्रासह असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यांपैकी एक स्वत:च्या ओळखपत्राचा पुरावा म्हणून सादर करणे बंधनकारक आहे. तसेच निळ्या किंवा काळ्या शाईचा बॉल पेन परीक्षार्थींकडे असणे आवश्यक आहे. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर आणि परीक्षेच्या दरम्यानही मास्क लावणे बंधनकारक असून कोरोनाविषयक अन्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या किमान एक तास आधी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्थापन
कोरोनाकाळात होत असलेली ही परीक्षा राज्य शासनाच्या कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून पार पडेल. परीक्षा केंद्राच्या निर्जंतुकीकरणासह परीक्षार्थींसाठी निर्जंतुकीकरण आणि तापमान तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन वा गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षार्थींनी 020 26122256 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा arogyabharti2021@gmail.com या ईमेल पत्त्यावर माहिती पाठवावी. परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून परीक्षार्थींनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत ‘न्यासा कम्युनिकेशन’ने या परीक्षेद्वारे निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे स्पष्ट केले.