पुणे :
स्वतःचे अस्तित्व विसरून आपल्या परिवारासाठी माता-भगिनी अविश्रांतपणे झटत असतात. यामुळे बर्याचदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. समाजाला सबल करणार्या महिला वर्गास दर्जेदार, जलद आणि मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे आवारात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
नवरात्र उत्सवानिमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्य नोंदणीसाठी ABHA (Ayushman Bharat Health Account) कार्ड योजना देखील आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्याबद्दलही महिला तसेच महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या समाजात दुय्यम वागणूक मिळाल्याने अनेक महिला आरोग्यसेवांपासून वंचित राहतात. माता-भगिनींना दुय्यम स्वरूपाची वागणूक देण्याची समाजाची ही मानसिकता खोडून काढली पाहिजे, असे डॉ. सावंत म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी कागदपत्रांच्या जाचक अटी कमी करून तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत १०४ क्रमांकाच्या हेल्पलाइनच्या मदतीने दिवसातील २४ तास आरोग्यसेवा सक्रिय करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याद्वारे अर्ध्या तासात एका आरोग्य कर्मचार्यासह प्रथमोपचाराची सुविधा नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या आरोग्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची शासनाची भूमिका असून ग्रामीण भागात शेतीवर काम करणार्या गरोदर महिलांसाठी ३०० दिवसांसाठी प्रतिदिन ३०० रुपये रोज मानधन देण्याच्या आरोग्य विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेचे अनावरण झाले आणि विद्यार्थिनींना चष्मे वाटप करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यापीठाशी सुसंवाद साधल्याबद्दल त्यांनी राज्याचा आरोग्य विभाग, तसेच मंत्रीमहोदयांचे आभार मानले. तत्पूर्वी राज्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी प्रस्ताविक केले. आरोग्य विभागाने नव्याने सुरू केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा तपशील त्यांनी मांडला.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुंबईचे आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, पुण्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे आवार प्रमुख शितल मोरे, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन देवरे आदी मान्यवर, तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एसएनडीटी पुणे आवारातील विविध विभागांच्या विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली.