मुंबई :
अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या चार महत्त्वाच्या सीईटी परीक्षेच्या नोदणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी उच्च शिक्षण विभागातील आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीचे वेळापत्रक नुकतेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष सीईटी परीक्षेला विलंब झाल्याने त्याचा परिणाम पुढील शैक्षणिक प्रक्रियेवर झाला. त्यामुळे यंदा सीईटीची प्रवेश प्रक्रिया वेळेत व्हावी यासाठी सीईटी सेलकडून कंबर कसण्यात आली आहे. त्यानुसार सीईटी सेलकडून एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला १० फेब्रुवारीला सुरुवात केली. ही नोदणी प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतर सीईटी सेलकडून टप्प्याटप्याने अन्य अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यापार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या आठ अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेचे आणि परीक्षेचा सर्वसाधारण वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बीए.बीएड.बीएससी.बीएड चार वर्ष इंटिग्रेटेड अभ्यासक्रम, बीएड.एमएड. तीन वर्ष इंटिग्रेटेड अभ्यासक्रम, एलएलबी ५ वर्ष इंटिग्रेटेड अभ्यासक्रम यांच्या नोंदणी प्रक्रियेला १९ मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे बीपीएड, एमपीएड, एमएड या अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला २२ मार्चपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, या विद्यार्थ्यांना ७ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा साधारणपणे मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यानंतर घेण्यात येणार आहेत. तसेच बीएड, बीएड.इलेक्टेड आणि एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमांच्या नोदणी प्रक्रियेला २४ मार्चपासून सुरुवात होणार असून, या अभ्यासक्रमाला १२ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा जूनमध्ये होणार आहेत. त्याचप्रमाणे एमबीए, एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रिया १७ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान चालणार आहे.