मुंबई :
बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातलेला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट नुकताच तेलुगू, तामीळ आणि अन्य दक्षिण भारतीय भाषांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित चित्रपटामध्ये हिंदी सबटायटल दिले नव्हते, तसेच हिंदीमध्ये प्राईम व्हिडिओवर चित्रपट प्रदर्शित न केल्याने प्रेक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. प्रेक्षकांची ही तक्रार आता लवकरच दूर होणार असून, कारण ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे
अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. प्रेक्षकांचाही तो पसंतीस उतरलेला आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळेच ज्या वेळेस हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणण्याची घोषणा करण्यात आली, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. हा चित्रपट हिंदीभाषिक प्रदेशामध्ये चांगली कमाई करत असल्याने तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणण्यास विलंब केला असावा, असे मत चित्रपट तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.