मुंबई
मुंबई सेंट्रल येथील मे. हर्बोलॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या डॉ. वैद्य या संकेतस्थळावर आयुर्वेदिक औषधांच्या आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निदर्शनास आले होते. त्यानुसार एफडीएच्या औषध निरीक्षकांनी कारवाई करत ७ लाख ६० हजारचा मुद्देमाल जप्त केला.
डॉ. वैद्य या संकेतस्थळावर आयुर्वेदिक औषधांच्या मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली होती. या जाहिरातीमधील अनेक आयुर्वेदिक औषधांबाबत औषधे व जादुटोनादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चे उल्लंघन केल्याचे प्राथमिक दर्शनी आढळून आले. त्यामुळे एफडीएचे औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे व राजेश बनकर यांनी मे. हर्बोलॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या मुंबई सेंट्रल येथील कार्यालयाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांना हर्बो टर्बो ऑईल, पुनर्वा गोळ्या, सायक्लो हर्ब, डायबेक्स कॅप्सूल, हर्बो ब्लिस, हर्बो काल्म, रेनो हर्ब इत्यादी आयुर्वेदिक औषधे मोठ्या प्रमाणात आढळून आली. या औषधांच्या लेबलवर पुरुषांमध्ये कामवासना वाढवणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित करणे, मुतखडा बरा करणे, उच्च रक्तदाब कमी करणे, मधुमेह बरा करणे अशा प्रकारचे दावे करणारा आक्षेपार्ह मजकूर छापलेला आढळून आला. हा आक्षेपार्ह छापील मजकूर हा औषधे व जादुटोनादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चे उल्लंघन करणारी असल्याचे दिसून आले. त्यामुळे एफडीएकडून जवळपास ७ लाख ६० हजारांची आयुर्वेदिक औषधांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (औषधे) गौ. बा. ब्याळे यांनी दिली.
बाजारात होत असलेल्या फसव्या जाहिरातीपासून सावध राहा. तसेच काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करण्याचे आवाहनही एफडीएकडून करण्यात आले आहे.