मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दिवाळीपूर्वी हळूहळू रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आली. मात्र दिवाळी संपल्यानंतरसुद्धा ही तेजी कायम राहिल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रॉपर्टीच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतान दिसून येत आहे. प्रॉपर्टी नोंदणीच्या माध्यमातून नोव्हेंबरला सरकारला मिळालेल्या उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न डिसेंबरच्या अवघ्या १७ दिवसांमध्ये मिळाले आहे.
मुंबई नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात झाल्यावर ऑक्टोबरमध्ये मुंबईमध्ये ८५७६ इतक्या प्रापर्टीची नोंदणी झाली. यातून राज्य सरकारला ५५० कोटी ११ लाख १९ हजार इतके उत्पन्न मिळाले. नोव्हेंबरमध्ये असलेल्या दिवाळीमध्ये प्रॉपर्टी खरेदीला अधिक प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून आले. नोव्हेंबरमध्ये ७५८२ इतक्या घरांची नोंदणी झाली असून, ५४९ कोटी ३२ लाख ९६ हजार इतके उत्पन्न मिळाले. मात्र डिसेंबरमध्ये प्रॉपर्टीच्या नोंदणीमध्ये अधिक वाढ झाली. डिसेबरच्या अवघ्या १७ दिवसांमध्ये ५४७५ इतक्या घरांची नोंदणी झाली असून, त्यातून ४४९ कोटी ८९ हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे घर खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हटवलेल्या निर्बंधामुळे लोक पुन्हा घर खरेदीकडे वळल्याचे नोंदणी विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याकडून सांगण्यात आले.
नेरळ, कर्जतमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक घरे बांधण्यात आली आहेत. प्रत्येक वर्षी किमान पाच हजार नवीन घरे तयार होत आहेत. एमटीएचएल प्रोजेक्ट सुरू झाल्याने मुंबईमधून वाशी, रायगड,सह अन्य परिसरांमध्ये एका तासांमध्ये पोहोचणे शक्य होणार असल्याने नागरिकांचा कल वाढत असल्याचे नारेडकोचे नेरल कर्जतच्या युनिटचे उपाध्यक्ष दिनेश दोषी यांनी सांगितले.
कोरोनामुळे लोकांना स्वत:च्या घराचे महत्त्व समजले आहे. यापूर्वी भाड्याच्या घरात राहण्याला पसंती देणार्या तरुण वर्गाकडून आता स्वत:चे घर खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. मुंबईतील गगनाला भिडणार्या घरांच्या किंमतीमुळे नागरिक आता कल्याण, नेरळ, कर्जतमध्ये स्वस्त घराचा शोध घेत आहेत.
– गौतम ठक्कर, अध्यक्ष, नेरळ कर्जत युनिट, नारेडको