मुंबई :
चित्रपटप्रेमींकडून मिळालेल्या भव्य अशा प्रतिसादाबरोबरच ‘बळी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी भयपटाला चित्रपट समीक्षक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली आहे. ‘अॅमेझॉन प्राइम’वर ९ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट १३ वर्षे आणि त्यावरील वायोगटातील प्रेक्षकांमध्ये आणि त्यातही तरुण व शाळा-महाविद्यालयात जाणार्या मुलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे.
सर्वांगसुंदर अशा या चित्रपटाला सर्वच बाबतीत वाहवा मिळत आहे. या चित्रपटाची जी परीक्षणे प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये या चित्रपटाच्या दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय या सर्वच अंगांची प्रशांसा करण्यात आली आहे. हॉरर चित्रपटाची ही संकल्पना उत्तम आकारास आली असून हा चित्रपट पहिलाच पाहिजे असा आहे, असे टाईम्स न्यूज नेटवर्कने आपल्या परीक्षणात नमूद केले आहे. या चित्रपटात जे प्रयत्न झाले आहेत त्यासाठी आणि सशक्त अशा कथेसाठी त्याला पूर्ण गुण, असे या परीक्षणात म्हटले आहे. ‘स्क्रोल’ या वेबपोर्टलने आपल्या परीक्षणात दिग्दर्शक विशाल फुरिया यांच्याबद्दल गौरोवोद्गार काढले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून कथेतील रूग्णालयाची ही सफर काहीसी रहस्यमय आणि बरीचशी भयावह असेल याची काळजी त्यांनी घेतली आहे.
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘बळी’चे स्ट्रीमिंग २४० देशांमध्ये होत आहे. गोठवून टाकणार्या या थ्रिलरचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. या प्रकारच्या भयपट दिग्दर्शनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. चित्रपटात चतुरस्त्र प्रतिभेचा नायक स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बळी’ही एका विधुर आणि मध्यमवर्गीय अशा श्रीकांत (स्वप्नील जोशी) व्यक्तीची कथा आहेत. त्याचा ७ वर्षांचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) जेव्हा एकदा आकस्मिकपणे कोसळून पडतो तेव्हा कथेत एक वेगळे वळण येते. त्याला जन संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात येते आणि तिथून खर्या अर्थाने भीतीने गोठवून टाकणार्या घटना घडत जातात. प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि समीक्षकांकडून आलेले गौरोवोद्गार यांचा आम्हाला अतिशय आनंद आहे. ‘बळी’ हा जरी हॉरर चित्रपट असला तरी तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे, याबद्दल सर्वत्र एकमत नोंदविले गेले आहे.