- मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेकडून ५० गुणवंत शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कारप्राप्त गुणवंत शिक्षकांमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या उत्कृष्ट कार्य करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल मुलुंडमधील गव्हाणपाडा मनपा मराठी शाळेतील वरिष्ठ शिक्षिका अनघा सुनील आईर यांचा ७ सप्टेंबरला मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दहा हजार रूपये ईसीएसद्वारे, प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तामिळ,तेलुग, गुजराती, कन्नड माध्यमातील शिक्षक, खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक, मनपा माध्यमिक विभागातील शिक्षक तसेच स्पेशल शिक्षक (शारीरिक शिक्षण, हस्तकला, चित्रकला, संगीत) यातील जवळपास चार हजार शिक्षकांमधून गुणवंत ५० शिक्षकांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये मुलुंडमधील गव्हाणपाडा महानगरपालिका मराठी शाळेतील वरिष्ठ शिक्षिका अनघा सुनील आईर यांची निवड करण्यात आली. अनघा आईर यांनी गव्हाणपाडा मनपा मराठी शाळेत शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या उत्कृष्ट कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा नियमित सुरु करता आल्या नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, समूह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून सर्व विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी परिसरात, रेल्वे स्टेशन, सिग्नल आदी ठिकाणी शोधमोहीम घेऊन या मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी त्या नेहमीच झटत असतात. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका म्हणून शालेय प्रशासन तसेच मनपा प्रशासनाला आवश्यक माहिती वेळीच देणे, शाळा व्यवस्थापन समितीद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती वाढविण्यासाठी आणि विविध सामाजिक संस्थांकडून शाळेसाठी सीएसआर फंड घेऊन शाळेतील भौतिक सोयी-सुविधा वाढविण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. अनघा सुनील आईर यांना घोषित झालेल्या आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कारासाठी त्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.