Voice of Eastern
मोठी बातमीशिक्षण

आयडॉलमधील सुधारणांसाठी तब्बल पाच वेळा आणला स्थगन प्रस्ताव; सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

banner

मुंबई : 

आयडॉल या दूरस्थ शिक्षणाची सोय असलेल्या विद्यापीठाच्या कलिना संकुलातून नोकरी करणारे लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. या विद्यार्थी प्रवेश नोंदणीतून मुंबई विद्यापीठाला कोट्यवधीची उत्पन्न मिळते. मात्र या विभागाकडे मुंबई विद्यापीठ दुर्लक्ष करत असून, आयडॉलचे उपकेंद्र, परीक्षा केंद्र, नवीन अभ्यासक्रम, प्राध्यापक भरती, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे अशा समस्यांबाबत सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांना तब्बल पाच वेळा स्थगन प्रस्ताव आणावे लागले. आता तरी प्रश्न सोडवा हे आयुध मी किती वर्षे वापरु अशी भावना त्यांनी सिनेटमध्ये व्यक्त केली. यावर आयडॉलचे सर्व प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील, आयडॉलच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी विद्यापीठाने पावले उचलली असल्याची माहिती कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली. आयडॉलमधील सुधारणांसाठी सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांना तब्बल पाचवेळा स्थगन प्रस्ताव सादर केल्यानंतर विद्यापीठाला जाग आली.

मुंबई विद्यापीठाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या आयडॉलच्या विकासाकडे मुंबई विद्यापीठाकडून दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी संख्येत पाच वर्षामध्ये मोठी घट झाली आहे. एकीकडे २८ वर्षांचे असलेले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात (वायसीएमओयू) दरवर्षी सात ते आठ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात तर १६७ वर्ष जुने असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये हीच संख्या ६४ हजार आहे, वायसीएमओयूमध्ये ४० अभ्यासक्रम असून, आयडॉलमध्ये अवघे १७ अभ्यासक्रम का? वायसीएमओयूकडे परीक्षेसाठी जवळपास १००० केंद्र आहेत मात्र आयडॉलकडे परीक्षेसाठी एकही केंद्र नाही, तसेच आयडॉलमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक, ग्रंथपाल आणि पूर्णवेळ संचालक नसणे असे अनेक प्रश्न युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे तब्बल पाचवेळा उपस्थित केले. त्याला युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी अनुमोदन दिले. सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी अनेक महाविद्यालये आयडॉलला परीक्षा केंद्रासाठी जागा देत नसल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. आयडॉलच्या सुधारणेबाबत पाचवेळा स्थगन प्रस्ताव सादर करावा लागल्याबद्दल सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी खंत व्यक्त केली. यावर उत्तर देताना आयडॉलच्या माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे कामधंदा करणारे असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे व सहज व्हावे यासाठी आयडॉलमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत मुंबई विद्यापीठ प्रयत्न करत आहे. या अभ्यासक्रमांना युजीसीची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर आयडॉलमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. मात्र हे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबई विद्यापीठाला आयडॉलच्या नावामध्ये बदल करावा लागणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सिनेटमध्ये दिली.

आयडॉलच्या अभ्यासक्रमांची रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्गात प्रसिद्धी करण्यात येणार असून, आयडॉलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे, निकाल घेणे यासाठी सावंतवाडी, ठाणे तसेच पालघरमधील विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तर परीक्षेवेळी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

आयडॉलमध्ये २० नवे अभ्यासक्रम

आयडॉलमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अ‍ॅड. वैभव थोरात यांनी यांनी केलेल्या पाठपुराव्या यश आले असून, आता जवळपास २० नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. यातील एमबीए, बीएएफ, एमए जिओग्राफी हे तीन अभ्यासक्रम १ नोव्हेंबरपासून तर उर्वरित १७ अभ्यासक्रम हे १ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम वाढवण्याबरोबच २८ नवे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत नवी भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीला शैक्षणिक व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल २०२२ मध्ये मुंबईकरांचा जल्लोष

Voice of Eastern

वाहन चालकाना आता लायसन्स मिळणार ऑनलाईन!

Voice of Eastern

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

Leave a Comment