मुंबई :
‘डिझाइन अॅण्ड मेकिंग’ या क्षेत्रामध्ये करियर करणार्या आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना अधिक सखोल व प्रत्यक्ष शिक्षण मिळावे या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांने आयआयटी मुंबईमध्ये ‘डिझाईन अॅण्ड मेकिंग’ लॅब उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या लॅबमधील अद्ययावत मशिनरीमुळे इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अनेक नवीन गोष्टी शिकता येणार आहेत. ‘डिझाईन अॅण्ड मेकिंग’ लॅब उभारण्याबाबत आयआयटी मुंबई आणि माजी विद्यार्थी दीपक सातवलेकर यांच्यामध्ये नुकताच करार झाला. या करारानुसार लॅब उभारण्यासाठीचा सर्व खर्च सातवलेकर करणार आहेत.
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील प्री इंजिनियरिंग ट्रान्सिस्ट बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर ही लॅब उभारण्यात येणार आहे. या लॅबला सातवलेकर दांम्पत्याचे नाव देण्यात येणार आहे. लॅबमध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक कामाबरोबरच थ्रीडी प्रिटंर्स, लेसर कटिंग, कॅड (कम्प्युटर एडेड डिझाईन सॉफ्टवेअर) आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मशिनरी असणार आहेत. आयआयटी मुंबई ही देशामध्ये सायन्स आणि इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये अव्वल आहे. ही मजल गाठण्यासाठी संस्थेने इंजिनियरिंगच्या विविध शाखा बदलत परिस्थितीशी सुसंगत राहण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीचा प्रयत्न केला आहे. ही नवीन सुविधा आमच्या लक्ष्याच्या दिशेने आणि आमच्या शिकवण्यातील अनुभव अधिक दांडगा करण्यास उपयोगी ठरणार आहे. ‘डिझाईन अॅण्ड मेकिंग’ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक वृद्धिंगत करण्यास या लॅबमुळे मदत होणार असल्याने दीपक सातवलेकर यांचे आभार मानतो, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी दिली.
आयआयटी मुंबईने मला माझे करियर घडवण्यासाठी मदत केली आहे. डिझाइन अॅण्ड मेकिंग लॅब हा एक माझ्यावर आयआयटी मुंबईचा असलेले ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगामध्ये असलेले शिक्षण घेण्यास मदत होऊन त्यांचा त्यांना फायदा होईल, असे दीपक सातवलेकर यांनी सांगितले.