Voice of Eastern

मुंबई :

आयआयटी मुंबईमधून कर्मचारी नव्हे तर नियोक्ते आणि उद्योजक घडतील. संस्थेचे प्रतिभावान विद्यार्थी रोजगार निर्माते म्हणून उदयाला येतील, जागतिक कल्याणासाठी कार्य आणि नाविन्यपूर्ण संशोधन करतील आणि एक मजबूत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने देखील काम करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई संकुलातील विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेले ‘हॉस्टेल १७’ या नवीन वसतिगृहाचे रविवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी गुणवंत विद्यार्थी, अभ्यासक्रम आणि प्राध्यापकांबरोबरच कॅम्पसचे वातावरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वातावरण सकारात्मकता निर्माण करते. तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला स्फूर्ती मिळेल. प्रत्येकामध्ये नवोन्मेष आणि योगदान देण्याची क्षमता असते. आयआयटी मुंबईमध्ये एक नवीन पर्व सुरु केले आहे. नवीन वसतिगृहात १,११५ खोल्या आहेत आणि आज उद्घाटन झालेली इमारत ही पहिल्या संचांपैकी एक आहे जी इमारत आयआयटी मुंबईने पूर्णपणे उच्च शिक्षण वित्त पुरवठा संस्थेच्या निधीतून बांधलेली आहे. यासाठी अंदाजे ११७ कोटी रुपये खर्च आला आहे.

२१ वे शतक हे ज्ञानाचे युग असणार आहे आणि त्यात आयआयटी मुंबईने प्रमुख भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी केले. मला ठाम विश्वास आहे की देशात फक्त काही मोजक्या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत ज्यांच्याकडे २१ व्या शतकातील समस्यांवरची उत्तरे आहेत आणि आयआयटी मुंबई ही त्यापैकी एक आहे असे ते म्हणाले. आयआयटीने पुढील ५० वर्षांसाठी आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वतता या क्षेत्रांसह भारताच्या गरजा जाणून घ्याव्यात आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करावे अशी सूचना त्यांनी केली. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शुभाशीष चौधरी यांनी प्रधान यांना संस्थेबद्द्ल विस्तृत माहिती दिली आणि संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत अवगत केले.

Related posts

२४ तासाच्या आत अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा – महेश तपासे

ठाण्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

Bhandup child death : एनआयसीयूसाठी खासगी संस्थेला सव्वा आठ कोटींचे आंदण

Voice of Eastern

Leave a Comment