Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था अयोग्य : आयआयटी मुंबई

banner

मुंबई : 

मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व वेगवान करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र मुंबईतील विद्यार्थ्यांना अद्यापही शाळेत पोहचण्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्थेचे प्रमाण सुयोग्य नसल्याचे उघडकीस आले आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासातून हे वास्तव उघडकीस आले आहे.

आयआयटी मुंबईतील सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. गोपाळ पाटील आणि गजानंद शर्मा यांनी केलेल्या अभ्यासत मुंबईतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक पुरेशी नसल्याची बाब समोर आली आहे. शहरात काही भाग असे आहेत की जेथे गरजेनुसार कमी शाळा आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करून शाळेत जावे लागत आहे. मुंबईतील सर्व विभागांमध्ये सम प्रमाणात वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. काही भागात भरपूर बस थांबे, रेल्वेची जोडणी अशा सुविधा आहेत तर काही भागात विद्यार्थ्यांना ४० ते ६० मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सुविधांमध्ये विषमता दिसून येत आहे. ४६० चौरस किमी परिसरातील मुंबईच्या ५७७ विभागांमध्ये चार हजार ३०८ शाळांचा अभ्यास या अभ्यासकांनी केला आहे. ‘जीओग्राफिक इन्फरमेशन सिस्टीम’ (जीआयएस)चा वापर करून हा अभ्यास करण्यात आला आहे. यानुसार त्यांच्या असे लक्षात आले की सर्व शाळा या विद्यार्थ्यांना १० ते ४० मिनिटे एवढ्या अंतरावर आहेत. यानंतर संशोधकांनी शाळेत पोहचण्यासाठी उपलब्ध वाहतूक सुविधांचा नकाशा बनविला. यामध्ये खाजगी वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक अशा दोन्हींचा विचार करण्यात आला आहे. असे लक्षात आले की, १० ते ४० मिनिटांच्या प्रवासाठी उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुरेशी नाही. यासाठी अनेकदा खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी खाजगी वाहतूकीचा वापरही कमी होत असल्याचे समोर आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. याचबरोबर शहरातील प्राथमिक शाळांच्या तुलनेत उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कमी असल्याची नोंदही अभ्यासत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात उच्च प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बाजावत असतात. विशेषत: भांडूप, गोराई या भागात शाळांची कमतरता आहे तर मानखूर्द, माहूल आणि ट्रॉम्बे भागात सार्वजिनक वाहतूक व्यवस्था कमी असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. शहर नियोजन आणि वाहतूक व्यवस्था या दृष्टीने सामाजिक समानता या उद्देशाने हा अभ्यास करण्यात आला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तर यामध्ये महापालिकेला शाळा, बसेस आणि वाहतूक व्यवस्था वाढविण्याबाबत सुचना करण्यात आल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या विषयाचा पुन्हा अहवाल तयार करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

महाराष्ट्रीय संशोधकांच्या डिसॅबिलिटी रेस्क्यू मॅनेजमेंट सिस्टिमला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Voice of Eastern

स्वामी समर्थ कबड्डी : एकतर्फी विजयासह बीपीसीएल, आयएसपीएल, मध्य रेल्वे उपांत्य फेरीत 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पहाटे होणार विठ्ठलाची महापूजा

Leave a Comment