Voice of Eastern

मुंबई : 

कलेची जोपासणा व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी कला संचालनालयाकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कलेचे धडे दिले जातात. मात्र कलेचे धडे देणार्‍या कला संचालनालयाला प्रभारी व कंत्राटाचे ग्रहण लागले आहे. परिणामी संचालनालयाच्या अनेक कामांचा खोळंबा होत आहे. याचाच प्रत्यय नुकत्याच पुढे ढकलण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेवेळी आला. संचालनालयाचे संचालक प्रभारी तर अनेक शिक्षक व कर्मचारी हे कंत्राटी असल्याने ही परीक्षा घेताना विद्यार्थ्यांबाबत कोणताच विचार केला नसल्याचे दिसून आले.

कला संचालनालयामध्ये संचालक हे पद महत्त्वाचे समजले जाते. मात्र अनेक वर्षांपासून हे पद प्रभारी आहे. या पदाबरोबरच शासकीय रेखा कला परीक्षा आणि उच्च कला विभागातील महत्त्वाची पदे ही प्रभारी आहेत. कला संचालनालयातील महत्त्वाची पदे प्रभारी असताना लिपिक व चतुर्थश्रेणी स्तरावरील कर्मचारी ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती केलेले कर्मचारी अनेकदा दुसरीकडे चांगली नोकरी मिळाल्यावर ही नोकरी सोडून जातात. त्यामुळे कामाचा खोळंबा होतोच पण त्यांना काम व्यवस्थित होण्याशी काहीही देणेघेणे नसते. कला संचालनालयातील अनेक महत्त्वाची पदे ही प्रभारी असताना ती कला क्षेत्राशी संबंधित असावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रभारी असलेल्या अधिकार्‍यांचा कल त्यांच्या स्वत:च्या विभागातील कामे पूर्ण करण्याकडे अधिक असतो. त्यामुळे कला संचालनालयातील कामे नियोजनबद्ध पद्धतीने न होता मोठ्या प्रमाणात रखडत आहेत. पदे प्रभारी असण्याची काही कालमर्यादा असते. मात्र कला संचालक व कला उपसंचालक ही पदे अनेक वर्षांपासून प्रभारी आहेत. याचा परिणाम कला संचालनालयातील कामे, परीक्षा व योजनांवर होत असून, त्यामुळे संचालनालयाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे मुंबई उपनगरचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी केला आहे.

जे. जे. कला संचालनालयामार्फत इंटरमिजिएट व एलिमेंट्री परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी परीक्षा विभागामध्ये परीक्षा नियंत्रक कायमस्वरुपी असणे आवश्यक आहे. मात्र हे पद प्रभारी असल्याने त्याचा परिणाम या परीक्षांवर होताना दिसून येत आहे. त्यातून यंदा घेण्यात येणार्‍या परीक्षांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईनवरून गोंधळ उडाल्याचे दिसून आले. कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रण विभाग सक्षम होण्यासाठी विभागामध्ये स्वायत्त मंडळ स्थापन करण्यात यावे, चित्रकला निरीक्षक हे पद पूर्णवेळ नियुक्त करण्यात यावे. त्याचबरोबर तांत्रिक पदाची निर्मिती करण्यात यावी. शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेचे नियोजन व मूल्यमापन आणि परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणीही मुंबई उपनगरचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी केली आहे.

Related posts

दिवाळीत बंपर धमाका; ‘टायगर ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Voice of Eastern

जे. जे. रुग्णालयाचे नाव झळकणार एलईडी स्वरूपात

Voice of Eastern

जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार महानिदर्शने

Leave a Comment