Voice of Eastern

मुंबई :

मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. १९९७ साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले. पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे माझे ठाम मत आहे. पण स्पॉट फिक्सिंग तसेच वैयक्तिक फिक्सिंग नक्कीच होते, असा स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी. निमित्त होतं क्रिकेटमधल्या जिंगरबाज खेळाडूंच्या कारकीर्दीला -कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी एजिस फेडरल इन्शुरन्स आणि लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या गट्स आणि ग्लोरी क्रिकेट सन्मान संध्येचं. या सन्मान संध्येत अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी या दिग्गजांना दिलीप वेंगसरकर आणि करसन घावरी या दिग्गजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दिग्गजांचा जीवनप्रवास उलगडणाऱया या सन्मान संध्येत कसोटीपटूंनी अशी जोरदार बॅटिंग केली की पु.ल. देशपांडे सभागृहात मैदानावरच्याच नव्हे तर मैदानाबाहेरच्या किश्श्यांचा अक्षरश: पाऊस पडला. या क्रिकेट किश्श्यांचा काळ सत्तरी- ऐंशीच्या दशकातला असला तरी टी-ट्वेण्टीच्या पॉवरप्ले मधल्या धडाकेबाज खेळाला लाजवेल अशी चौकार-षटकारांच्या हास्याची आतषबाजी क्रिकेटच्या धुरंधरांनी केली. याप्रसंगी केवळ हास्याचे चौकार-षटकारच ठोकले गेले नाही तर चाचपडायला लावणाऱया बाउंसर आणि यॉकर्सचाही मारा करण्यात आला. दिग्गज क्रिकेटपटूंचे किस्से ऐकायला क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे उसळत होते. या सन्मान संध्येबद्दल एजिस फेडरलचे सर्वेसर्वा विघ्नेन शहाणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल क्रिकेटप्रेमींसह क्रिकेटपटूंनीही मनापासून आभार मानले. याप्रसंगी सर्वात वयस्कर भारतीय कसोटीपटू असलेल्या दत्ताजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रफितही दाखविण्यात आली. या फितीत चंदू बोर्डे यांनी त्यांच्या असंख्य आठवणी ताज्या केल्या.

एजिस फेडरल आयोजित सन्मान संध्येचा शेवट भन्नाट होता. गायकवाड यांना कार्यक्रमाचे सुत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांनी १९९७ साली निधास ट्रॉफीच्या वेळी श्रीलंकेत झालेल्या मॅचफिक्सिंगच्या प्रकाराबाबत त्यांना छेडले असता, ते म्हणाले, मला श्रीलंकेविरूद्धच्या फायनलपूर्वी मध्यरात्री एक निनावी फोन आला. त्याने सांगितले, फायनल फिक्स झालीय. भारत हरणार आहे. हे ऐकून माझा विश्वास बसत नव्हता. मी संघातल्या मुख्य खेळाडूंशी चर्चा केली. मग सचिन असो किंवा अझर. दोघांनीही विश्वास दिला की असे काही झालेले नाही. फायनल आपणच जिंकणार. तरीही मी प्रशिक्षक म्हणून खूप काळजी घेतली. जसं आम्ही मॅचपूर्वी प्लॅनिंग केलं होतं तसेच आमचे खेळाडू खेळले आणि फायनल आपण जिंकलो. त्यामुळे माझा मॅच फिक्सिंगवर विश्वास नाही. मॅच फिक्सिंग होत नाही. मॅच फिक्स करण्यासाठी दोन्ही संघातले किमान चार-पाच खेळाडू त्यात सहभागी असायला हवेत. पण असे होत असावे मला वाटत नाही. पण मॅच फिक्सिंग झाल्याचे लोकं म्हणतात. तसे सिद्धही झालेय. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगपेक्षा स्पॉट फिक्सिंग किंवा वैयक्तिक फिक्सिंग शक्य असल्याचेही ठाम मत गायकवाड यांनी मांडले. या कार्पामात करसन घावरी यांनी मैदानाबाहेरचे अफलातून किस्से सांगून उपस्थितांना भरभरून हसवले. तसेच दिलीप वेंगसरकर यांनी विंडीज संघाविरूद्ध भारतीय खेळाडूंची अवस्था सांगून चांगलीच दाद मिळविली.

कपिलला थांब सांगणं कठिण होतं

भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू कपिल देवला त्याच्या निवृत्तीबाबत सांगणं आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. तेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदविल्यानंतर कपिलने निवृत्ती जाहीर करावी, असे सर्वांचे मत होते, पण पामानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कपिलने आणखी दोन वर्ष खेळणार असल्याचे जाहीर करताच आमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कपिलने आता थांबायला हवं, असे सर्वाना वाटत होते, पण त्याला हे सांगणार कोण? ही जबाबदारी सर्वांनी माझ्याच खांद्यावर टाकली. पण कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले आणि सन्मानाने पुढच्याच सामन्यात निवृत्ती जाहीर केली, अशी आठवण अंशुमन गायकवाड यांनी सांगितली.

सभागृहात हसे पिकवणारे भन्नाट किस्से

गट्स आणि ग्लोरी कार्यक्रमात अंशुमन गायकवाड यांनी आपल्या लौकिकाला साजेशी जिगरबाज फलंदाजी केली. मी क्रिकेटपटू नसतानाही मी कसा घडलो, याचे सभागृहात हसे पिकवणारे भन्नाट किस्से गायकवाड यांनी सांगितले. शाळेत अभ्यास ढ असल्यामुळे बाबांनी क्रिकेट खेळायला सांगितले, पण फलंदाजी करताना फार भीती वाटायची. माझा खेळ पाहून बाबांनी मला पुन्हा शिक्षणाकडे लक्ष द्यायला सांगितले. पण मी बाबांचे ऐकले नाही. शाळेत मी फारच घडलो नाही, पण विद्यापीठात मला खूप शिकायला मिळालं, माझं खरं क्रिकेट इथेच बहरलं. भारतीय संघात निवड झाल्यावर विंडीजविरूद्धच पदार्पण होते. भारतातली ती मालिका आपण जिंकलो. पण वेस्ट इंडीजच्या वेगवान तोफखान्यासमोर उभं राहणंच कठिण असताना, खेळणं आणखी कठिण असायचं. विंडीजसमोर आपण धीराने खेळायचो, म्हणून आपल्याला सलामीला बढती दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला आणि रॉबर्टस्-होल्डिंगसमोर अवघा भारतीय संघ जायबंदी होत असताना आपण लढविलेला किलल आणि त्यानंतर आपली थेट आयसीयूमध्ये बुक झालेली खाट ही थरारक आठवणही ते सांगायला विसरले नाहीत.

दगडाने नारळ पाडण्याचा कलेने झालो गोलंदाज

भारताचे एकेकाळचे वेगवान गोलंदाज उमेश कुलकर्णी यांचा क्रिकेटप्रवासही अचंबित करणार होता. सन्मानमूर्ती कुलकर्णी आपल्या क्रिकेटप्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, अलिबागला दगडाने नारळ पाडण्याच्या माझ्या नेममुळेच मी गोलंदाज झालो. दगड मारण्याची कलाच माझी गोलंदाजीची स्टाइल झाली. माझ्या या प्रकारामुळे आईने मला माझ्या मामांकडे गिरगावला धाडले. गिरगावला पोहोचल्dयावर शालेय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पण तेव्हा माझ्याकडे ना क्रिकेटचे कपडे होते ना शूज. माझ्या क्रिकेटप्रवासाची खडतर सुरूवात अनवाणीच झाली.हॅरिस शिल्डच्या सामन्यातही हीच परिस्थिती होती, तेव्हा मित्रांचे कपडे आणि शूज घेऊन खेळलो होतो आणि याच अवस्थेतून मी भारतीय संघापर्यंत पोहोचल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Related posts

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका -अजित पवार

वाढत्या कोरोनाबरोबरच बनावट सॅनिटायझरच्या उत्पादनातही वाढ!

Voice of Eastern

३० जानेवारीला दोन मिनिटे मौन राहून हुतात्म्यादिनी पाळा

Voice of Eastern

Leave a Comment