नवी दिल्ली :
महाराष्ट्रामध्ये तब्बल महिनाभर पुरेल इतका लस साठा आहे. यामध्ये कोवॅक्सिनच्या न वापरलेल्या २४ लाखांपेक्षा जास्त मात्रा असून, या पुढील १० दिवस पुरतील, तसेच कोविशील्डच्या सुमारे १.२४ कोटी मात्रा शिल्लक असून, त्या ३० दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरतील अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्राकडे कोवॅक्सिनच्या न वापरलेल्या २४ लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत. तसेच १४ जानेवारीला या लसीच्या अतिरिक्त ६.३५ लाख मात्रा मिळाल्या आहेत. कोविनवर उपलब्ध असलेल्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, १५ ते १७ वयोगटातील लाभार्थींसाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी दैनंदिन सरासरी वापर २.९४ लाख मात्रा आहे. त्यामुळे कोवॅक्सिनची लस पुढील १० दिवस पुरेल इतका साठा महाराष्ट्राकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कोविशील्डच्या सुमारे १.२४ कोटी मात्रा उपलब्ध आहेत. यामध्ये न वापरलेल्या व शिल्लक साठ्याचा समावेश आहे. कोविशील्डच्या दिवसाला सरासरी ३.५७ लाख मात्रांचा वापर केला जातो. हा साठा ३० दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरू शकतो, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.