मुंबई :
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार वर्ष २०२२ पासून पुढील पाच वर्षासाठी अधिसभा प्रतिनिधी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अधिसभेसाठी विविध गटांतून मतदानास पात्र मतदारांची अंतिम यादी विद्यापीठाने आधीच जाहीर केली आहे.
त्याचबरोबर नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील मतदानासाठी पात्र उमदेवारांची अंतिम यादीही जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून दिले जाणारे विद्यापीठातील १० शिक्षक, १० प्राचार्य, विद्यापीठातील तीन शिक्षक तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थातील व्यवस्थापन मंडळाच्या सहा प्रतिनिधींसाठीची निवडणूक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. या निवडणुकीस इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत भरावयाचे आहेत. अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२२ आहे. निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांसाठीचे अर्ज आणि त्या संबंधीची परिपत्रके, महत्वपूर्ण सूचना इत्यादी विद्यापीठाच्या sndt.ac.in या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या आहेत. याबरोबरच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, विद्या शाखा आणि इतर विविध अभ्यास मंडळे यांच्या अंतिम मतदार याद्या, त्यावरील प्रतिनिधींची निवडणूक व नियुक्ती प्रक्रियेबाबतची माहिती, वेळापत्रक व इतर आवश्यक बाबी वेळोवेळी विद्यापीठाच्या sndt.ac.in या संकेत स्थळावर घोषित केले जाईल.
इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध सूचनांचे अवलोकन करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलसचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठाचा पुन्हा घोळ : विधी अभ्यासक्रमाची परीक्षा तोंडावर पण हॉल तिकीटच नाही