मुंबई :
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत लोकसंख्येच्या आधारावर वार्ड व नगरसेवक संख्येत ९ ने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील वॉर्डची संख्या २२७ वरून २३६ इतकी होणार आहे. मात्र यामध्ये उपनगरातील वॉर्डमध्ये बदल होणार असून, पूर्व उपनगरात चार वॉर्ड तर पश्चिम उपनगरात पाच वॉर्ड वाढणार आहेत.
मुंबई शहर विभागात ५६, पूर्व उपनगरात ६९ तर पश्चिम उपनरात १०२ वार्ड, असे मिळून २२७ वार्ड व तेवढेच सर्वपक्षीय नगरसेवक आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारीत २०२२ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबर अखेरीस सादर केला. त्यानुसार उपनगरातच सर्वाधिक लोकसंख्या वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढलेल्या भागात वार्ड व नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार पूर्व उपगरात पवई, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड, भांडूप-मुलुंड पश्चिम भाग, विक्रोळी-कांजूरमार्ग पूर्व, नाहूर, भांडूप पश्चिम या वॉर्डमध्ये बदल होणार आहे.