विक्रोळी :
कन्नमवार नगरमधील यशोदीप फाउंडेशनच्या वतीने १६ वर्षांपासून अध्यात्माच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा श्रीमद् भागवत कथा महोत्सवाबरोबर विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सव आणि शिबिराला भाविक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
यशोदीप फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा महोत्सवातून ह.भ.प. महादेव महाराज तौर यांनी भागवत ग्रंथातील भगवान श्रीकृष्णाच्या कथा व भजने त्यांच्या रसाळ वाणीतून भाविकांसाठी सादर केली. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा प्रसंग महाराज कथेतून सांगत असताना बाळ श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात बसवून पाळणा गीत म्हणण्यात येऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव प्रसंग साजरा करण्यात आला. अनेक महिला भाविकांनी रासलीला नृत्यातही मंत्रमुग्ध होऊन सहभाग घेतला. यशोदीप फाउंडेशनच्या वतीने भाविकांना श्रीमद् भगवदगीतांचे वाटप तसेच राजोल संजय पाटील यांच्यातर्फे नववर्षाचे कॅलेंडर सर्वांना भेट देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी कै. नरसिंह अली व कै. अभिमन्यू घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ बाबुभाई जीनवाल यांच्या सौजन्याने विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबीन, थायरॉईड, रक्तदाब, संधिवात, पायांची संवेदना, फुप्फुस क्रिया, लिवर क्रिया, हाडांचा ठिसुळपणा व दंत चिकित्सा या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी अनियमितता आढळलेल्या रुग्णांची लोकमान्य टिळक, सायन हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी पुढील तपासणी करून काही निवडक औषधे विनामूल्य दिली. पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले. व्हिजन फाउंडेशन ट्रस्टमार्फत अनेक रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी विनामूल्य करण्यात आली. ज्या रुग्णांच्या डोळ्यात मोतीबिंदू आढळला त्यांची शस्त्रक्रिया बाबुलनाथ येथील त्यांच्या ट्रस्टच्या रुग्णालयातून विनामूल्य करण्यात येणार आहे. ज्यांच्या डोळ्यात दृष्टिदोष आढळला त्यांना यशोदीप फाउंडेशनतर्फे विनामूल्य चष्मे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांचे व कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनमळे यांनी आभार मानले. विक्रोळीमध्ये १६ वर्षांपर्यंत चालत असलेले हे कार्य पुढे अव्याहतपणे व अखंडपणे चालू ठेवण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन प्रकाश सोनमळे यांनी केले.