मुंबई
ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शनिवारी राज्यात आणखी 8 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा हा 48 वर पोहोचला आहे. राज्यात शनिवारी सापडलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मुंबईतील तर 3 रुग्ण सातारा व 1 रुग्ण पुण्यातील आहे. तर शनिवारी ओमायक्रॉनचे तीन रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 28 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार मुंबई विमानतळाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 4 रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण मुंबई, छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि इंग्लंडचा प्रवास करून आलेले आहेत. हे चारही जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. हे सर्व रुग्ण सध्या विलगीकरणात आहेत. त्याचप्रमाणे सातारा येथे 3 रुग्ण सापडले असून, हे तिघेही पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे. तसेच पुणे येथे 17 वर्षाच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या मुलीमध्ये कोणतीही लक्षणे नसून ही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा संपर्कात आली होती. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.
राज्यात आजपर्यंत ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण सापडले असून, त्यामध्ये मुंबई १८, पिंपरी चिंचवड १०, पुणे ग्रामीण ६, पुणे मनपा ३, सातारा ३, कल्याण डोंबिवली २, उस्मानाबाद २, बुलढाणा १, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार १ यांचा समावेश आहे. यापैकी २८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.