मुंबई :
गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे अभियांत्रिकीचा दबदबा कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र यंदा अभियांत्रिकीच्या प्रवेशात वाढ झाली असून, रिक्त जागांचे प्रमाण घटले आहे. गतवर्षी ४४.४५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा अवघ्या ३६.२४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदा १ लाख २५ हजार ६३८ जागापैकी ७९ हजार ७२४ जागावर यंदा प्रवेश झाले आहेत. तर ४५ हजार ९१४ जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी जागा रिक्त राहण्याचे प्रमाण ५५ हजार ४४४ इतके होते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्त राहत असल्याने अनेक संस्थांवर महाविद्यालये बंद करण्याची वेळ आहे. दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशामध्ये घट होत असल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत होत्या. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी प्रवेशासाठीही अनुत्सूक असल्याचे दिसून येत होते. मात्र यंदा अभियांत्रिकीला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच गेल्यावर्षी बारावीचा निकाल वाढल्याचा परिणाम आणि सीईटी सेलने नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेली प्रवेश प्रक्रिया याचे परिणाम अभियांत्रिकी प्रवेशात दिसून आले आहेत. पदवी अभियांत्रिकी बी.ई/बीटेक या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शासकीय, अनुदानित, विद्यापीठस्तरावरील बहुतांश जागा भरल्या आहेत. विनाअनुदानित जागा मोठ्या प्रमाणात राहिल्या आहेत. विनाअनुदानित ३०६ महाविद्यालयातील १ लाख १८ हजार जागा होत्या. त्यापैकी ४४ हजार ७८१ जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
कोरोना काळात प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांमुळे प्रवेश वाढले आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत झाल्याने यंदा अभियांत्रिकीच्या प्रवेशामध्ये वाढ झाली.
– रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल