Voice of Eastern

मुंबई :

हिंद महासागरात सागरी उष्णता कालावधीचे प्रमाण  वाढत आहे. त्याचा परिणाम भारतातील मान्सूनवर  होत असल्याचे पुणे स्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केलेल्या अभ्यासातून उघडकीस आले आहे.

‘जेजीआर ओशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात संशोधकांनी सागरी उष्णता घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.  हिंदी महासागराच्या तापमानात वेगाने होत असलेली वाढ आणि प्रबळ अल निनो यांचा हा परिणाम आहे. समुद्राचे तापमान वाढण्याच्या घटनेमुळे मध्य भारतीय उपखंडातील पावसाचे प्रमाण कमी तर दक्षिण द्वीपकल्पातील पावसाचे प्रमाण वाढवत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. कोल यांनी सरन्या जे.एस. (केरळ कृषी विद्यापीठ), पाणिनी दासगुप्ता (आयआयटीएम ), आणि अजय आनंद (कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ) या  शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे  संशोधन केले आहे.

सागरी उष्णता कालावधी म्हणजे काय?

सागरी सागरी उष्णता कालावधी हा समुद्रातील अत्यंत उच्च तापमानाचा कालावधी (90 पर्सेन्टाइल पेक्षा अधिक) असतो.  यामुळे प्रवाळांचा रंग बदलतो, सागरी गवत नष्ट होते आणि समुद्रातील शेवाळ वनांचा नाश होतो. ज्यामुळे मत्स्यपालन क्षेत्रावर परिणाम होतो. मे 2020 मधील सागरी उष्णतेच्या घटनेनंतर तामिळनाडू किनार्‍याजवळील मन्नारच्या आखातातील 85 टक्के प्रवाळाचा रंग बदलला असल्याचे पाण्याखाली केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले. अलीकडील अभ्यासांत जागतिक महासागरांमध्ये उष्णतेच्या वाढत्या घटना आणि त्याचे परिणाम नोंदवण्यात येत असले तरी,  उष्णकटिबंधीय हिंदी महासागरात त्या कमी आढळतात.

प्रत्येक दशकात होतेय मोठी वाढ

उष्णकटिबंधीय हिंदी महासागरात अशा प्रकारच्या उष्णतेच्या घटना दुर्मिळ होत्या. मात्र आता दरवर्षी आढळतात. पश्चिम हिंदी महासागरात प्रत्येक दशकात सुमारे १.५ या दराने सागरी उष्णतेच्या प्रसंगांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्याखालोखाल  बंगालच्या उत्तरेकडील उपसागरात दशकात ०.५ दराने वाढ झाली आहे. १९८२-२०१८ दरम्यान, पश्चिम हिंदी महासागरात ६६ तर बंगालच्या उपसागरात ९४ वेळा असे घडले आहे.

मान्सूनवर परिणाम

बंगालचा उपसागर आणि पश्चिम हिंद महासागरात सागरी उष्णतेच्या घटनांमुळे मध्य भारतीय उपखंडात कोरडेपणा जाणवतो. त्याच वेळी, बंगालच्या उत्तरेकडील उपसागरातील या घटनांमुळे दक्षिण द्वीपकल्पीय भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. हे बदल उष्णतेच्या प्रसंगाद्वारे बदललेल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा परिणाम आहेत. सागरी उष्णतेच्या लाटा, वातावरणीय परिसंचार आणि पर्जन्यमान यांचा संबंध असल्याचे प्रथमच या अभ्यासाने दाखवले आहे.

भविष्यातील आव्हान

हिंद महासागरात भविष्यात तापमानवाढीची शक्यता हवामान मॉडेलच्या अंदाजात वर्तवली आहे. यामुळे सागरी उष्णतेच्या घटना आणि पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. समुद्री उष्णतेच्या प्रसंगांची वारंवारता, तीव्रता आणि त्याचे वाढते क्षेत्र या घटनांचे अचूक निरीक्षणासाठी आपल्याला महासागर निरीक्षण व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. तापमानवाढीबाबत जगाने मांडलेल्या आव्हानांचा अंदाज लावण्यासाठी हवामानविषयक मॉडेल अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले.

Related posts

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर 

झरीन खानने साजरे केले अनोखे रक्षाबंधन

Voice of Eastern

तरुणाईच्या जल्लोषात विक्रोळीत ‘प्रारंभ’ची दिवाळी पहाट साजरी

Voice of Eastern

Leave a Comment