मुंबई :
मुंबईसह राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांकडून हँड सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार या पार्श्वभूमीवर बनावट हँड सनिटायझरच्या उत्पादन करणार्यांनाही वेग आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबईतील गुप्तवार्ता विभागास तळोजा येथील कारखान्यात बनावट व भेसळयुक्त हँड सँनिटाइझरचे उत्पादन होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एफडीएच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात १८.८४ लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
तळोज एमआयडीसीमधील ए.ए. केमिकल्स या कंपनीमध्ये बनावट व भेसळयुक्त हँड सॅनिटायझरचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली. त्यानुसार एफडीएने १७ नोव्हेंबरला सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.ए. केमिकल्सच्या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत कारखान्यास सौंदर्य प्रसाधने उत्पादनाचा परवाना प्राप्त असल्याचे आढळून आले. या ठिकाणी विविध प्रकारची व वेगवेगळ्या ब्रँड नावाने हँड सँनिटाइझरचे विनाअनुमती, बनावट व भेसळ करून उत्पादन होत असल्याचे आढळून आले. तसेच मोठ्या प्रमाणात ५ लिटर व ५०० मि.ली.च्या डब्यात लेबल लावलेला विक्रीयोग्य हँड सँनिटाइझरचा साठा उपलब्ध होता. उपलब्ध साठ्यातून ६ नमुने चाचणी विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित १८.८४ लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला. चाचणीसाठी घेतलेल्या सर्व नमुन्यांच्या अहवालानुसार ते बनावट असून, त्यामध्ये मिथेनॉलची भेसळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. एका नमुन्यात कोणतेही अल्कोहोल नसून त्यात केवळ सुगंधित द्रव असल्याचे आढळून आले. त्यामुळे या कारखान्याच्या मालकाविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्या संस्थेस त्वरित कामकाज बंदचे आदेश बजावण्यात आले आहे. तळोजा पोलीस व अन्न औषध प्रशासन, रायगड पुढील तपास करीत आहे.
सर्वसामान्य जनतेने औषधांच्या दर्जा बाबत कोणतीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित जिल्हा कार्यालय तसेच टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा असे आवाहन माननीय आयुक्त परीमल सिंह यांनी केले आहे.