Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

शहरी भागात विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले; मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरांमध्ये मात्र अद्यापही अल्प प्रतिसाद

banner

मुंबई : 

राज्यामध्ये ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित राहिले होते. मात्र चार दिवसांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्येही सातारा (८०.१२ टक्के) शहरी भागामध्ये शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याखालोखाल हिंगोली ७९.८७ टक्के, वाशिम ७७.७२ टक्के, वर्धा ७४.५२ टक्के तर बीड ७३.२८ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती पोहोचली आहे. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्याबाबत मात्र अल्प प्रतिसाद दिसत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार तब्बल दीड वर्षांनंतर ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र चार दिवसांनंतर आलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागातील शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध शहरी भागांपैकी सातारा ८०.१२ टक्के, शहरी भागामध्ये शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याखालोखाल हिंगोली ७९.८७ टक्के, वाशिम ७७.७२ टक्के, वर्धा ७४.५२ टक्के तर बीड ७३.२८ टक्के या जिल्ह्यांमध्ये शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांगली शहरामध्ये सर्वाधिक ९४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. मात्र चार दिवसांमध्ये अन्य शहरांच्या तुलनेत सांगलीतील शाळांमधील विद्यार्थ्याच्या संख्येत अल्प वाढ झाली आहे. राज्यातील विविध शहरांमधील पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असताना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालक फारसे उत्सूक नसल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात चार दिवसांमध्ये फक्त १३.७९ टक्के विद्यार्थ्यांची वाढ झाली. तर नागपूरमध्ये अवघी ३.४८ टक्के वाढ झाली. मात्र नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत कोणताही बदल दिसून आला नाही.

मुंबई, ठाण्यात विद्यार्थ्यांमध्ये घट

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबई व ठाणे शहरातील विद्यार्थ्यांच्या संख्येत चार दिवसांत घट झाली. मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी ४३.५१ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. चार दिवसांनंतर ही संख्या ३४.३८ टक्क्यांवर आली. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असताना राज्य मंडळाच्या शाळांमध्ये १० टक्क्यांनी विद्यार्थी संख्येत वाढ झाली. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी ४०.२५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. चार दिवसांनंतर ही संख्या ३८.५० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

Related posts

‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा

४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र असणार ‘भागीदार राज्य’

गर्भवती, ज्येष्ठांचा नॅशनल पार्कमधील फेरफटका झाला सुखकर

Leave a Comment