मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा वादाच्या भोवर्यात सापडली होती. मात्र राज्य परीक्षा परिषदेने मोठ्या संयमाने या परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन केले. २०२१-२२ साठी १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या नोंदणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २०२१-२२ यावर्षी राज्यातून तब्बल ७ लाख ९ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातील ३ लाख २७ हजार ७८६ मुलांनी तर ३ लाख ८१ हजार ८६४ मुलींनी नोंदणी केली आहे. यातही इयत्ता पाचवीच्या विद्यार्थींनींची संख्या अधिक आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २०२०-२१ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेला फारच कमी प्रतिसाद मिळाला. जवळपास तीन लाखांपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने २०२१-२२ च्या होणार्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आल्यानंतरही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा राज्यातून इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या एकूण ७ लाख ९ हजार ६५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. इयत्ता ५ वीसाठी ४ लाख १० हजार ३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये १ लाख ९४ हजार ८५० मुलांनी तर २ लाख १५ हजार ५४५ मुलींनी नोंदणी केली आहे. तसेच इयत्ता ८ वीसाठी नोंदणी केलेल्या २ लाख ९९ हजार २५५ विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ३२ हजार ९३६ मुलांनी तर १ लाख ६६ हजार ३१९ इतक्या मुलींनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षी इयत्ता ५ वीसाठी ३ लाख ८८ हजार ५१२ तर ८ वीसाठी २ लाख ४४ हजार ३११ विद्यार्थ्यांनी असे एकूण ६ लाख ३२ हजार ८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ वर्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ७६ हजार ८२७ इतक्या जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.