मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षेकडून राबवण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत नुकतीच तंत्रशिक्षण विभागातील ११ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळत असलेल्या बीई/बीटेक, बी.फार्म, एम.फार्म, एमसी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एमसीए आणि एमबीएच्या अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार बीई/बीटेक अभ्यासक्रमाला गतवर्षी ७६,२२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यावर्षी प्रवेशामध्ये वाढ झाली असून, गतवर्षीपेक्षा १२,१६४ अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने बीई/बी.टेकला यंदा ८८,३९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याचबरोबर बी.फार्मच्या प्रवेशामध्ये गतवर्षीपेक्षा ४७५३ प्रवेश वाढले आहेत. बी.फार्मला गतवर्षी २६ हजार ४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर यंदा ३० हजार ७९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याचप्रमाणे एम.फार्मच्या प्रवेशातही वाढ झाली आहे. एमसीएला गतवर्षी ६५९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, यंदा ८५०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. तसेच मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचा अभ्यासक्रम असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एमबीएला गतवर्षी ३० हजार २६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते तर यंदा ३६ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.