ऑकलंड :
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपच्या साखळी फेरीमध्ये शनिवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून निसटता पराभव पाहावा लागला. या पराभवामुळे सलामीवीर यास्तिका भाटिया (८३ चेंडूंत ५९ धावा), कर्णधार मिताली राज यांना (९५ चेंडूंत ६८ धावा) गवसलेला सूर तसेच उपकर्णधार हरमनप्रीत कौरसह (४७ चेंडूंत नाबाद ५७ धावा) अष्टपैलू पूजा वस्त्रकारची (२८ चेंडूंत ३४ धावा) सातत्यपूर्ण खेळी व्यर्थ ठरली.
भारताचे २७८ धावांचे लक्ष्य कांगारूंनी ४९.३ षटकांत ४ विकेटच्या बदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या १२ चेंडूत ११ धावांची गरज होती. मेघना सिंगने ४९व्या षटकात केवळ ३ धावा देत १ विकेट घेतला. पण शेवटच्या षटकात झुलन गोस्वामीला दोन चौकार खेचत बेथ मुनीने तीन चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले. ९७ धावांची झुंजार खेळी करणारी कर्णधार मेग लॅनिंग विजयाची शिल्पकार ठरली.
लॅनिंगचे शतक हुकले तरी तिची १०७ चेंडूंतील अप्रतिम खेळी ऑस्ट्रेलियासाठी मॅचविनिंग ठरली. तिच्या झटपट खेळीमध्ये १३ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार लॅनिंगसह अलीसा हिली हिच्यासह (६५ चेंडूंत ७२ धावा) रॅकेल हेन्स (५३ चेंडूंत ४३ धावा) तसेच एलिसा पेरी (२८ धावा), बेथ मुनी (नाबाद ३०) यांनीही विजयात मोलाचा वाटा उचलला. हिली आणि हेन्सने १९.२ षटकांत १२१ धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. हिली आणि हेन्सला १० चेंडूंच्या फरकाने बाद करण्यात पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणाला यश आले तरी मेग लॅनिंगने ११८ मिनिटे खेळपट्टीवर तग धरून कॅप्टन्स इनिंग पेश करताना पेरी आणि मुनीला हाताशी धरून भारताला विजयापासून दूर नेले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. स्मृती मानधना (१० धावा) आणि शफाली वर्मा (१२ धावा) स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार मिताली राज आणि यास्तिका भाटियांना सूर गवसला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी करताना संघाला पावणेतीनशेच्या घरात पोहोचण्यात मोठी भूमिका बजावली. यास्तिकाने ६ चौकारांसह ५९ धावा केल्या तर मितालीने १२२ चेंडू खेळताना सर्वाधिक ६७ धावा कुटल्या. हाणामारीच्या षटकांत हरमनप्रीतच्या ५७ धावा आणि पूजा वस्त्रकारच्या झटपट ३४ धावांमुळे भारताने २७७ धावा केल्या. हरमनच्या ४७ चेंडूंतील नाबाद अर्धशतकात अर्धा डझन चौकारांचा समावेश आहे. पूजाने तिला चांगली साथ देताना ३१ चेंडूंत झटपट खेळी केली. तिने एक चौकार आणि २ षटकार मारले. कांगारूंकडून डॅर्सी ब्राऊनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दिलेला २९ अवांतर धावांचा बोनस भारताच्या पथ्थ्यावर पडला.
भारताचा पाच सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे. मिताली राज आणि सहकारी ४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. भारताचे आणखी तीन सामने शिल्लक असून चांगल्या फरकाने विजय मिळवल्यास उपांत्य फेरीची आशा बाळगता येईल.
विक्रमी पाठलागासह सेमीफायनलमध्ये
ऑस्ट्रेलियाने केवळ सामना जिंकला नाही तर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केला. तसेच गुणतालिकेतील वर्चस्व कायम राखताना सलग पाचव्या विजयासह (१० गुण) दिमाखात उपांत्य फेरी निश्चित केली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल गाठणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला संघ ठरला.