नवी दिल्ली :
देशात वित्तीय समावेशन करण्यासाठीचा सर्वात मोठा उपक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केलेल्या पोस्ट पेमेंट बँकेने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर पोहोचल्याची घोषणा बँकेने केली. बँक सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये सर्वाधिक जलद गतीने विस्तारलेल्या बँकांपैकी ही एक बँक ठरली आहे.
आयपीपीबीने १.३६ लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून पाच कोटी खाती डिजिटल आणि कागदरहित व्यवहार करत सुरु केली. यापैकी १.२० लाख खाती ग्रामीण असून त्यातील १.४७ लाख ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना बँकिंग सेवा दिली आहे. यामुळे आयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वी केली आहे. पोस्टातील २ लाख ८० हजार कर्मचार्यांच्या सक्षमपणे ही मोहीम राबवली आहे. बँकेच्या खातेदारांपैकी ४८ टक्के महिला तर ५२ टक्के पुरुष खातेदार आहेत. महिलांच्या खात्यांपैकी ९८ टक्के खाती त्यांच्या घरी जाऊन उघडली असून, ६८ टक्के महिलांना या माध्यमातून थेट हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत. देशातील तरुणही पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील खातेधारकांची संख्या ४१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
देशातील सर्वात मोठे वित्तीय जाळे उभारण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. शहरी आणि ग्रामीण भारतातही बँकिंग सेवा विस्तारल्या आहेत. तीन वर्षात पाच कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कामगिरी ही यशाची पावतीच ठरली आहे. यातून किफायतशीर, सोपी सुलभ आणि सुरक्षित डिजिटल व्यवस्था ग्रामीण भागात निर्माण झाली. ग्रामीण भागातील महिलांच्या बँकिंग सेवा पुरवून आम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकलो, हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचे टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे यांनी सांगितले.
बँकेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आमचा ग्राहक विस्तार हा सामर्थ्याकडून सामर्थ्याकडे आहे. कोरोना काळातही आम्ही ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवल्या आहेत. ग्रामीण, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक बांधील आहे.
– जे. वेंकटरामू, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक