नवी दिल्ली :
दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि इतर आफ्रिकन देशातून १२ ते १४ चित्ते देशात आणण्यासाठी भारताकडून आफ्रिकन देशांशी सल्लामसलत बैठका सुरू आहेत. पुढील पाच वर्षात हे चित्ते आणण्यासाठी भारत सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. त्यासाठी ३८.७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
भारतातून चित्ता नामशेष झाल्याची घोषणा १९५२ मध्ये करण्यात आली. सध्याच्या घडीला भारताच्या कोणत्याच राष्ट्रीय उद्यानात किंवा वन्यजीव अभयारण्यात चित्ता उपलब्ध नाही. त्यामुळे भारतात चित्त्यांचे बस्तान बसविण्यासाठी गरजेनुसार विविध उद्याने, संरक्षित क्षेत्र किंवा परदेशातून १२ ते १४ सुदृढ जंगली चित्ते आणण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ८ ते १० नर आणि ४ ते ६ मादी चित्ते आणण्यात येणार आहेत. हे चित्ते प्रजोत्पादनाच्या वयात असलेले, रोगमुक्त, जनुकीय वैविध्य असलेले, उत्तम वागणूक असलेले, मानवाच्या अस्तित्वाशी जुळवून घेणारे, जंगलात शिकार करु शकणारे, शिकारी प्राण्यांपासून दूर राहणारे आणि एकमेकांचे अस्तित्त्व सहन करणारे अशा प्रकारचे चित्ते दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि इतर आफ्रिकन देशांतून पाच वर्षांत आणण्यात येणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार चित्ते आणण्यात येणार आहेत. या चित्त्यांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी GSM-GPS-VHF रेडियो कॉलर बसविण्यात येणार आहे.
भारतीय परिसंस्थेचा चित्ता महत्वाचा भाग असून, उत्क्रांतीचा महत्वाचा घटक तसेच महत्वाचा सांस्कृतिक वारसा होता. त्यांच्या पुनर्स्थापनेमुळे खुली जंगले, गवताळ प्रदेश आणि झुडपी परिसंस्थेचे संवर्धन होण्यास मदत होईल. यापार्श्वभूमीवर वर्ष २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पासाठी ३८.७० कोटींची तरतूद भारत सरकारकडून करण्यात आली आहे.