मुंबई :
आंतरराष्ट्रीय खगोल आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पीयाडमध्ये भारताने चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत अव्वल स्थान मिळवले आहे. ही स्पर्धा नुकतीच ऑनलाइन पार पडली होती.
विद्यार्थ्यांना मुलभूत विज्ञानात आवड निर्माण व्हावी यासाठी विविध विषयांमध्ये ऑलिम्पीयाडचे आयोजन केले जाते. यंदा कोलंबिया विद्यापीठातर्फे ऑनलाइन स्वरुपात आयोजित केलेल्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पीयाड स्पर्धेत फरीदाबाद येथील अनिलेश बन्सल, हिसार येथील सुरेन, मीरट येथील अऱ्हान अहमद, पुण्यातील चहल सिंग यांनी सुवर्ण तर मुंबईतील ध्रुव अहलावट याने रौप्य पदकाची कमाई केली आहे. या चमूची ही कामगिरी भारताची या विषयाच्या ऑलिम्पीयाडमधील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. बेंगळुरू येथील प्रा. ए. ए. देशपांडे आणि पुणे आयुका येथील रामप्रकाश यांनी या चमूचे नेतृत्व केले. तर प्रा. दुर्गेश त्रिपाठी, सरीता विग, डॉ. अक्षत सिंघल, डॉ. उत्तम भट यांनी पर्यवेक्षक म्हणून भूमिका पार पाडली. या स्पर्धेत यंदा ५२ देशांतील ६२ टीम्स आणि २९८ विद्यार्थी सहभागी झाले होते.