मुंबई :
अजगराची शेपटी कापून त्या ठिकाणी सुई दोर्याने शिवून त्याच्यावर तपकिरी रंग मारून अजगराला मांडूळ बनवून विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अजगराला मांडूळ बनवून विकणारे मात्र पोलिसांच्या हाती लागले नसले तरी अजगराची सुटका करून त्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी निघालेल्या दोन सर्पमित्राच्या मोटरसायकलाच रविवारी वांद्रे- कला नगर पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ५ डिसेंबर रोजी एका मोबाईल क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीने फोन करून वांद्रे भाभा रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून एका मांडूळ जातीचा साप असून तो विक्रीसाठी आणण्यात आला आहे अशी माहिती दिली. या माहितीवरून वांद्रे पोलीसांनी भाभा रुग्णालय गाठून रुग्णवाहिकेत एका गोणीत साप असल्याची खात्री केल्यानंतर सर्प मित्राला पाचारण केले. सर्प मित्र सिद्धार्थ कांबळे आणि दक्ष बेराडीया हे दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी रुग्णवाहिकेतून साप असलेली गोणी बाहेर काढली, त्यानंतर गोणी उघडताच गोणीत असलेल्या सापाला बघून सर्पमित्राना धक्का बसला. तो साप मांडूळ नसून अजगर होता, मात्र अजगर हा मांडूळ सारखा दिसावा म्हणून त्याच्यावर तपकिरी रंगाने स्प्रे करण्यात आला होता. तसेच मांडूळ या सापाला दोन्ही बाजूने तोंड असल्यामुळे या अजगराची शेपटी कापून त्याला तोंडासारखा आकार देऊन ती शेपटी सुईने आणि साध्या दोर्याने हाताने शिवण्यात आली होते. हा प्रकार बघून सर्पमित्राना धक्काच बसला अजगराला मांडूळासारखे बनवून तो विकण्याचा अज्ञात व्यक्ती प्रयत्न करीत असावा म्हणून सर्पमित्राने घटनास्थळी दाखल असलेल्या वांद्रे पोलिसांच्या ही बाब लक्षात आणून दिली.
वांद्रे पोलिसांनी याची ठाणे दैनंदिनीत नोंद करून सर्पमित्राचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर सर्प मित्र कांबळे आणि बेराडीया यांनी या अजगाराला उपचाराची गरज असल्यामुळे त्यांनी वन विभाग ठाणे यांना कळवले व आम्ही अजगर घेऊन येत असल्याचे कळवले. सर्पमित्र कांबळे आणि बेराडीया हे पोलीस ठाण्यात अजगाराची नोंद करून अजगर गोणीमध्ये टाकून वांद्रे येथून ठाण्याला जाण्यासाठी मोटारसायकल वरून निघाले. नव्याने बांधण्यात आलेल्या वांद्रे कलानगर पुलावरुन जात असताना सर्पमित्र यांच्या मोटारसायकलचा पुलावर भीषण अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर झाले असून त्यांना तात्काळ भाभा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. सिद्धार्थ कांबळे याची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. तसेच सर्पमित्राच्या ताब्यात असलेल्या अजगाराची बॅग वन विभागाच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अजगराचा मांडूळ बनवण्याचा प्रयत्न कोणी केला, भाभा रुग्णालयाबाहेर असलेल्या रुग्णवाहिकेत हा अजगर कोणी ठेवला, पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळवणारी व्यक्ती कोण याचा तपास वांद्रे पोलिसांनी सुरू केला आहे.