Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

महिला वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान कायम; बांगलादेशवर ११० धावांनी विजय

banner

हॅमिल्टन  :

महत्त्वपूर्ण साखळी लढतीत मंगळवारी तुलनेत कमकुवत बांगलादेशवर ११० धावांनी विजय मिळवत भारताने महिला वनडे वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे आव्हान कायम राखले. तिसऱ्या क्रमांकावरील यास्तिका भाटिया (५० धावा) आणि ऑफस्पिनर स्नेह राणा (४ विकेट) भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २२९ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ५० षटकांत ११९ धावांवर आटोपला. त्यांच्या पाच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला तरी सलमा खातून हिच्या ३२ धावा सर्वाधिक ठरल्या. भारताकडून ऑफस्पिनर स्नेह राणाने ३० धावांत ४ विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना हादरवले. तिला अनुभवी झुलन गोस्वामी (१९ धावांत २ विकेट) आणि पूजा वस्त्रकारची (२६ धावांत २ विकेट) चांगली साथ लाभली. भारताची कर्णधार मितालीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या पहिल्या सहा फलंदाजांनी प्रत्येकी २५पेक्षा जास्त धावा केल्या. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या संघाबाबत असे पहिल्यांदाच घडले.

सलामीवीर शफाली वर्माने दमदार पुनरागमन करताना (४२ चेंडूंत ४२ धावा) स्मृती मन्धानासह (५१ चेंडूंत ३० धावा) १५ षटकांत ७४ धावांची सलामी दिली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही पाच चेंडूंत तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला. मात्र, वनडाऊन यास्तिका भाटियाने दमदार अर्धशतक ठोकले. तिने ८० चेंडूंत ५० धावांची खेळी करताना डाव सावरला. कर्णधार मिताली राजने (०) निराशा केली. उपकर्णधार हरमनप्रीत कौरही (१४ धावा) लवकर बाद झाली. मात्र, यास्तिकाने यष्टिरक्षक, फलंदाज रिचा घोषसह (३६ चेंडूंत २६ धावा) अष्टपैलू पूजा वस्त्रकार (३३ चेंडूंत नाबाद ३० धावा) तसेच स्नेह राणा (२३ चेंडूंत २७ धावा) यांच्या मदतीने भारताला २२९ धावांची मजल मारून दिली. बांगलादेशच्या रितू मोनीने ३७ धावांत ३ विकेट घेतल्या.गोलंदाजांनी छाप पाडली तरी यास्तिका भाटिया हिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारताचा ६ सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. सहा गुणांसह त्यांनी वेस्ट इंडिजला थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

झुलन गोस्वामीचा सलग तिसरा विक्रम

बांगलादेशला हरवत स्पर्धेतील आव्हान कायम राखणाऱ्या भारताची सर्वात अनुभवी मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी हिने तिसऱ्या सामन्यात सलग तिसरा विक्रम रचला. झुलनने पहिला चेंडू टाकताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. महिलांच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात २०० डावांमध्ये गोलंदाजी करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. या यादीत जेनी गुन ही (१३६ डाव) दुसऱ्या स्थानी आहे.

Related posts

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सदस्यपदी महाडमधील दहिवडच्या सुपुत्राची नियुक्ती

कोरोना मृतांच्या कुटुंबियांचे चार हजार अर्ज अपात्र

जुहू चौपाटी येथे दोन मुलांना लाईफगार्ड वाचविले

Voice of Eastern

Leave a Comment