Voice of Eastern

मुंबई :

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारताची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. सद्य:स्थितीत मिताली राज आणि सहकाऱ्यांसह इंग्लंड आणि यजमान न्यूझीलंडमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस आहे.

भारताची यंदाच्या विश्वचषकातील कामगिरी संमिश्र आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून विजयारंभ केला तरी पुढील सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून मात खावी लागली. वेस्ट इंडिजला हरवले तरी त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. भारताच्या खेळात सातत्याचा अभाव आहे. उर्वरित दोन सामन्यांत भारतासमोर आता बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. तुलनेत बांगलादेश कमकुवत प्रतिस्पर्धी आहे. त्यांना ४ सामन्यांत केवळ एक सामना जिंकता आलेला नाहे. मात्र, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. सद्य:स्थितीत त्यांनी पहिले चारही सामने जिंकलेत. त्यामुळे फॉर्मातील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताचा कस लागेल. भारताने खेळ उंचावताना दोन्ही सामने जिंकले तरी इंग्लंड आणि न्यूझीलंडची कामगिरी महत्त्वपूर्ण राहील. किवींचा एक सामना शिल्लक आहे. शेवट गोड केला तरी त्यांचे सहा गुण होऊ शकतात. मात्र, इंग्लंडच्या माध्यमातून भारतासमोर कडवे आव्हान असेल. सुरुवातीला सलग तीन पराभव पाहावे लागलेल्या इंग्लिश संघाला भारतानेच बळ दिले. त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतात.

हरमनप्रीत, मन्धानाचे सातत्य

भारताची सर्वाधिक भिस्त फलंदाजीवर असते. त्यात उपकर्णधार हरमनप्री कौर आणि सलामीवीर स्मृती मन्धानाने बऱ्यापैकी सातत्य राखले आहे. हरमनप्रीतने पाच सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकलीत. तिला मन्धानाची (एक शतक, एक अर्धशतक) चांगली साथ लाभली आहे. दुसरी सलामीवीर यास्तिका भाटियासह कर्णधार मिताली राज, अष्टपैलू पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणाने प्रत्येकी एकदा हाफ सेंच्युरी मारली तरी त्यांची कामगिरी लौकिकाला साजेशी नाही. आणखी एक ओपनर शफाली वर्मा (२ सामन्यांत १२ धावा) तसेच अष्टपैलू दीप्ती शर्माच्या (४ सामन्यांत ६० धावा) अपयशामुळे फलंदाजी ढेपाळली आहे. उर्वरित दोन सामन्यांत शफालीला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अन्य बॅटर्सनी खेळ उंचावण्याची गरज आहे.

राजेश्वरी, वस्त्रकार थोडे फार प्रभावी

भारताची बॉलिंगही अपेक्षेप्रमाणे होत नाही. राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्रकार (प्रत्येकी ८ विकेट) थोड्या फार प्रभावी ठरल्यात. मध्यमगती मेघना सिंगने ७ विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने निराशा केली आहे. दीप्ती शर्माही प्रभावी ठरत नाही. त्यामुळे सेमीफायनल गाठायचा असेल भारताच्या बॉलर्सनाही गियर्स बदलावे लागणार आहेत.

ऑस्ट्रेलियाची दिमाखात आगेकूच

ऑस्ट्रेलियाने पहिले पाच साखळी सामने जिंकत १० गुणांसह मोठ्या दिमाखात उपांत्य फेरी गाठली. सेमीफायनल निश्चित करणारा तो पहिला संघ ठरला. त्याच्यानंतर विजयी चौकार ठोकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा (४ सामन्यांत ८ गुण) अंतिम चार संघातील प्रवेश नक्की आहे. वेस्ट इंडिजने (६ गुण)पाच पैकी तीन सामने जिंकून बाद फेरीसाठी प्रबळ दावेदारी पेश केली आहे. चौथ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये चुरस आहे.

Related posts

कर्करोगाबाबत टाटा रुग्णालय देणार जगाला प्रशिक्षण

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना २८ सप्टेंबरपासून सुरुवात

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकांचे निकाल जाहीर

Voice of Eastern

Leave a Comment