पणजी :
एफ व्ही महोन्नाथन या मासेमारी बोटीकडून आलेल्या संकटकालीन माहितीच्या आधारे आयएनएस आदित्यने ०३ फेब्रुवारीला गोव्याच्या ७५ नोटीकल मैल पश्चिमेस असलेल्या एका गंभीर जखमी मच्छिमाराला तातडीने वैद्यकीय मदत दिली. विपिन असे या मच्छिमाराचे नाव असून त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता, तसेच ऑक्सिजन पातळीही खालावली होती.

आयएनएस आदित्यने तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी मच्छिमाराला आधी मासेमारी बोटीतच पूरक ऑक्सिजन आणि प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्याला जहाजावर आणले. विपिनला बाहेर काढण्यापूर्वी त्याच्या उजव्या हाताच्या अनेक बोटांना इजा झाल्यामुळे फ्रॅक्चर झाले होते. रक्तस्त्राव रोखण्यासाठी आणि प्रकृती स्थिर करण्यासाठी त्याच्यावर जहाजामध्ये उपचार करण्यात आले.
जहाजाने, बोटीतील कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा अन्नाची व्यवस्था केली. त्यानंतर जखमी मच्छीमाराची प्रकृती स्थिर झाल्यावर, त्याच्या सहकाऱ्यांच्या स्वाधीन केले.