Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

गिर्यारोहण क्षेत्रात आवड आहे, आता या अभ्यासक्रमातून मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

banner

मुंबई : 

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतातील पहिल्या-वाहिल्या ‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ या अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या एक-वर्षीय अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रणीची संस्था व दक्षिण भारतातील पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था असलेल्या गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (GGIM) च्या सहयोगाने हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. यांतील हिमालयात होणाऱ्या प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांसाठी उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (NIM) या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.  ‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ या एक वर्षीय अभ्यासक्रमाच्या वर्गांची सुरवात १८ ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी ‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ हा अभ्यासक्रम अधिकृतपणे सुरु झाल्याची ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे घोषणा केली. यावेळी इंडियन माउंटनियरिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर अशोक ऍबे, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे प्राचार्य कर्नल अमित बिश्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने, गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’चे संस्थापक- संचालक उमेश झिरपे तसेच गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते. गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे हेड ऑफ ऑपरेशन्स व एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे यांनी या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हे पण वाचा : दोन महिला गिर्यारोहकांची ६६७२ मीटर उंच गंगोत्री १ शिखरावर यशस्वी चढाई
‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून यात गिर्यारोहण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ विविध विषय शिकवणार आहेत. यात सुरवातीला ऑनलाईन माध्यमातून थेअरीचे वर्ग घेतले जातील. त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगेत प्रात्यक्षिक वर्ग भरविण्यात येतील. मार्चमध्ये अभ्यासक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना २४ दिवसांसाठी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तरकाशी येथील ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’ या प्रतिथयश गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हिमालयातील गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. एकूण १३२ जणांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा दिली होती, त्यातील ४५ जणांची मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली.

अभ्यासक्रमाचे उदघाटन करताना डॉ. करमळकर म्हणाले, “आजचा दिवस हा सीमोल्लंघनाचा आहे आणि आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे आपल्या कक्षा विस्तारात आहे. भारतातील पहिला वाहिला गिर्यारोहण विषयावरील डिप्लोमा कोर्सची सुरवात ही विद्यापीठाच्या कक्षा रुंदावण्याच्या प्रवासातील महत्वाची पायरी आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या महत्वाच्या अभ्यासक्रमांपैकी एक असून यांतून विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतीलच, सोबत विद्यापीठासाठी देखील हा अभ्यासक्रम अभिनव शिकवण देईल, याची मला खात्री आहे. गिर्यारोहण क्षेत्रावर आधारित अभ्यासक्रम तयार करताना त्याच क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य आपल्याला लाभले आहे. उमेश झिरपे व त्यांच्या GGIM संस्थेने अत्यंत मेहनतीने व सूत्रबद्धपणे हा अभ्यासक्रम तयार केला आहे.”

उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग अर्थात NIM चे प्राचार्य असलेल्या कर्नल अमित बिश्त यांनी हिमालयातील प्रशिक्षणाचे महत्व यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “या एक वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमातून अनेक हौशी गिर्यारोहकांना आपल्या आवडीचे रूपांतर व्यवसायिकेत करता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व GGIM यांनी हा अभ्यासक्रम अत्यंत सूत्रबद्धपणे तयार केला असून गिर्यारोहण व साहसी खेळ यांच्याशी संबंधित सर्वच बाबींचा या अभ्यासक्रमात उत्तमपणे समावेश केला आहे. या अभ्यासक्रमातील हिमालयात होणाऱ्या प्रशिक्षणाची जबाबदारी NIM वर असून, यात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण मिळेल, याची मी ग्वाही देतो. या अभ्यासक्रमातून सहभागी विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या सुसंगत गोष्टींचे उत्तम प्रशिक्षण मिळेल.”

हे पण वाचा : दोन महिला गिर्यारोहकांची ६६७२ मीटर उंच गंगोत्री १ शिखरावर यशस्वी चढाई

इंडियन माउंटनियरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर अशोक ऍबे यांनी गिरिप्रेमी व GGIM च्या गिर्यारोहण क्षेत्रातील कामगिरीविषयी तसेच  गिर्यारोहण व साहसी क्रीडा या क्षेत्रांना मुख्य धारेचा भाग बनविण्यासाठी घेतलेल्या कष्टांबद्दल कौतुक केले.  ते म्हणाले, “गिर्यारोहण क्षेत्रावर आधारित सर्व समावेशक व सक्षम अभ्यासक्रम तयार करणे, हे अतिशय कठीण काम आहे. मात्र, गिरिप्रेमीने हे शिवधनुष्य लीलया पेलले. फक्त गिर्यारोहणच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन मदत, पर्यावरणाची काळजी घेत केलेल्या मोहिमा या सर्वच गोष्टी त्यांना इतरांपासून वेगळे बनवतात. त्यांचा या सर्व क्षेत्रातील अनुभव गिर्यारोहण अभ्यासक्रमात उठून दिसतो आहे. गिर्यारोहणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या गिर्यारोहक-प्रशिक्षकांची उत्तम फळी गिरिप्रेमीकडे आहे, त्यामुळे ‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ हा अभ्यासक्रम निश्चितच सर्वाना फायद्याचा ठरेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. उमराणी यांनी गिर्यारोहण अभ्यासक्रम हा जागतिक दर्जाचा व अभिनव बनविण्यावर कसा भर दिला आहे, यावर भाष्य केले. या अभ्यासक्रमामुळे सहभागी विद्यार्थ्यांना साहस, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, संघभावना इत्यादी कौशल्ये विकसित करता येतील, या बाबत विश्वास व्यक्त केला.

विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. माने यांनी हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागे विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरण हे प्रात्यक्षिके व अनुभवांवर आधारित शिक्षणाला महत्व देते. याच धर्तीवर ‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ हा अभ्यासक्रम तयार केला असून सहभागी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक मूल्ये यांतून आत्मसात करता येतील.”

‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’चे संस्थापक- संचालक व ‘डिप्लोमा इन माउंटनियरिंग’ हा अभ्यासक्रम ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाला ते उमेश झिरपे म्हणाले, “या अभ्यासक्रमातून गिर्यारोहण ही एक जीवनशैली म्हणून आत्मसात करता येईल. हा संपूर्ण अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरेल, यांतून आयुष्याची मूल्ये शिकता येतील.”  

Related posts

मुंबई महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजातील इच्छुकांना रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देणार – रामदास आठवल

Voice of Eastern

सायन रुग्णालयामध्येही होणार आता बोन मॅरो प्रत्यारोपण

प्लास्टिक सर्जरीबाबत जनजागृतीसाठी नायर रुग्णालयाचा पुढाकार

Voice of Eastern

Leave a Comment