मुंबई :
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ निमित्त केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबई मुख्यालयाने या वर्षीच्या महिला दिनाच्या #BreakTheBias अर्थात ‘भेदभाव निपटून काढा’ या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यामध्ये सॅनिटरी नॅपकीन यंत्र बसवून त्याचे उद्घाटन करणे या उपक्रमाचा समावेश होता. कर्तव्यावर असताना कार्यालयात दीर्घकाळ व्यतीत करणार्या महिला कर्मचार्यांना या यंत्राचा मोठा उपयोग होणार आहे. या उपयुक्त उपक्रमासह पंतप्रधान रोजगार निर्माण योजनेतील महिला उद्योजकांचे अनुभव सामायिक करणे, आर्थिक व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यान तसेच महिला कर्मचार्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे उपक्रम पार पडले.
याआधी, केव्हीआयसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा यांनी कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आणि ३ दिवस चालणार्या खादी इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी देशातील विविध भागांतून आलेल्या महिला उद्योजकांनी प्रदर्शनातील स्टॉलमध्ये मांडलेल्या उत्पादनांची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केव्हीआयसीच्या सीव्हीओ डॉ. संघमित्रा यांनी त्यांची यशोगाथा सांगितली, तसेच त्यांनी समाजाप्रती स्त्रियांचे असलेले योगदान आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या इतर महिलांना कशाप्रकारे पाठींबा देऊ शकतील याचे विवेचन केले. तुमच्याकडे उत्तम शिक्षण असल्याशिवाय तुम्ही कुणालाही मदत करू शकत नाही. म्हणून उत्तम भविष्यासाठी प्रत्येकाने चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य मिळवावे यासाठी तुम्ही तुमच्या आजुबाजुच्यांमध्ये सतत संदेश पसरवत रहा. तुम्ही स्वतःची ताकद ओळखा, आपले निर्णय स्वतः घ्या आणि आपल्या आयुष्याला स्वतः आकार द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.